धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 21 फेब्रुवारी : प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्ट फोन आल्यानं सर्वांचंच आयुष्य आता स्मार्ट बनलंय. जगभरातील सर्व अपडेट्स तुम्हाला या स्मार्टफोनवर एकाच क्लिकमध्ये समजतात. या तंत्रज्ञानामुळे सर्व जग जवळ आलंय. त्याचवेळी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीवर आता नजर ठेवणं देखील सोपं झालं आहे. ही नजर ठेवण्याचं काम हे दुसरं-तिसरं कुणी नाही तर आपल्या सर्वांना मदत करणाऱ्या गूगलकडूनच होतं. मुंबईमध्ये नुकत्याच घडलेल्या एका प्रसंगातून ही बाब ठळकपणे समोर आली आहे.
Google मुळे वाचला जीव
तुम्ही स्मार्टफोन वापरताना तुमच्यावर गुगल नजर ठेवून असतो. मुंबईत नुकत्याच घडलेल्या एका प्रकरणात गूगलं एका 25 वर्षांच्या तरुणाचा जीव वाचवला आहे. ती व्यक्ती वारंवार आत्महत्या करण्याचा पर्याय गूगलवर शोधत होता. त्यावेळी गूगलकडून ही माहिती इंटरपोल आणि सीबीआय या यंत्रणांना कळवण्यात आली. त्यानंतर त्यांनी ती मुंबई पोलिसांना शेअर केली. त्याचबरोबर तरुणाचा आयपी अॅड्रेस देखील दिला. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत मुंबई पोलिसांनी तातडीनं सूत्रं हालवली.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी सर्व यंत्रणा कामाला लावून त्या तरूणाला शोधलं आणि त्याचा जीव वाचवला. संबंधित तरूण हा आयटी इंजिनिअर आहे. वेगवेगळी कर्ज फेडू शकत नसल्यानं तो प्रचंड तणावात होता. या नैराश्यातून त्यानं टोकाचा निर्णय घेतला होता, अशी माहिती पोलीस तपासामध्ये समोर आलीय.
सावधान! तुम्हीही चुकीचा पद्धतीने स्मार्टफोन चार्ज तर करत नाही ना? बॅटरी क्षणात होईल खराब
Google ची प्रत्येकावर नजर
कुर्ल्याच्या किस्मत नगर परिसरात राहणाऱ्या या तरुणाने मागच्या काही दिवसात आत्महत्येच्या संदर्भातील गोष्टी वारंवार सर्च केल्या होत्या. गुगलच्या नियमावलीनुसार वारंवार अश्या प्रकारच्या गोष्टी जर कोणी सर्च करत असेल तर त्याची नोटिफिकेशन गुगलला प्राप्त होते. त्यानंतर संबंधित तपासयंत्रणांना ही माहिती गुगलकडून पुरवली जाते.
सायबर तज्ज्ञ ॲड. प्रशांत माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'गुगलला आपली सर्व माहिती असते. आपण गुगल अकाउंट बनवतो त्यावेळेस त्यांच्या अॅग्रीमेंट मध्ये सर्व हक्क आपण त्यांना दिलेले असतात. त्यामुळे प्रायव्हसी ही गुगलच्या युगामध्ये एक मिथ्य आहे. तुमची प्रोफाइल त्यांच्याकडे बनलेली असते, ते आयपी ॲड्रेस ट्रॅक करू शकतात. तुम्ही संशयस्पद काही सर्च करत आहात असं अल्गोरिदमला वाटलं तर गुगलकडून अलर्ट जारी करण्यात येतो. त्यांनतर त्या संबंधित ठिकाणाच्या सुरक्षा यंत्रणांना त्याची माहिती मिळते. ही जेवढी चांगली टेक्नॉलॉजी आहे तेवढीच घातकही आहे.'
या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 'आक्षेपार्ह शब्द कुणी सर्च करत असेल तर त्यावर गूगलकडून यंत्रणांना अलर्ट केलं जातं. या सर्व यंत्रणांच्या तत्परतेमुळेच आत्महत्येच्या मार्गावर असलेल्या 25 वर्षांच्या तरुणाचा जीव वाचवण्यात मुंबई पोलिसांना यश आलं. पण, त्याचवेळी मोबाईलमधील प्रत्येक गोष्टीवर गूगलची नजर असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Google, Local18, Mumbai