श्रीगंगानगर, 20 नोव्हेंबर : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दिल्लीत घडलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांड ताजे असतानाच देशातून आणखी धक्कादायक घटना समोर येत आहे. यातच आणखी एका मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. आजारी वडिलांसाठी तूप विकत घेण्यासाठी गेलेल्या मुलीवर 5 जणांकडून सामूहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली. यात 3 BSF जवानांचा समावेश असल्याची माहिती आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यात एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. तरुणीने पाच जणांवर सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. यामध्ये सीमा सुरक्षा दलाच्या तीन जवानांचा समावेश आहे. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले. रायसिंगनगर पोलिस स्टेशन हद्दीत ही घटना घडली. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक बनवारीलाल मीना यांनी सांगितले की, पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, ती शुक्रवारी रात्री रायसिंगनगर येथील एका खासगी डेअरीत तिच्या आजारी वडिलांच्या उपचारासाठी गायीचे तूप घेण्यासाठी गेली होती. तेथे पाच तरुणांनी तिला पकडले आणि जबरदस्तीने एका खोलीत नेले. त्यानंतर पाचही जणांनी तिच्यावर खोलीत आळीपाळीने बलात्कार केला. पीडितेने कशीतरी स्वत:ची सुटका करून तेथून पळ काढला आणि घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली.
हेही वाचा - विवाहबाह्य संबंधाने घेतला जीव, प्रेयसीने पतीच्या मदतीने केले प्रियकराचे 6 तुकडे
एसीपी मीना यांनी सांगितले की, पीडितेच्या वतीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन बीएसएफ जवानांसह पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी केली जात आहे. याप्रकरणी रायसिंगनगर पोलिस उपअधीक्षक अनु बिश्नोई तपास करत आहेत. कलम 164 अंतर्गत पीडितेचे जबाबही नोंदवले जात आहेत. पोलिसांनीही घटनास्थळाची पाहणी केली आहे. पीडित मुलगी डेअरी चालकांना ओळखत होती. त्यामुळेच त्याने दोघांची नावे पोलिसांना सांगितली.
विशेष म्हणजे राजस्थानमध्ये पुन्हा एकदा बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या घटना वाढू लागल्या आहेत. अलीकडच्या काळात राज्यातील विविध पोलीस ठाण्यात बलात्कार आणि सामूहिक बलात्काराचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.