नालंदा, 20 नोव्हेंबर : दिल्लीत घडलेल्या श्रद्धा हत्याकांड नंतर देशात मोठी खळबळ उडाली आहे. सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. ही घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका महिलेने आपल्या पतीच्या मदतीने आपल्याच प्रियकराची हत्या केली. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. विवाहबाह्य संबंधामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
ही घटना नालंदा जिल्ह्यातील आहे. याठिकाणी एका विकास नावाच्या तरुणाला विवाहबाह्य प्रेमसंबंधाची चांगलीच किंमत मोजावी लागली आहे. नालंदा जिल्ह्यातील सिलाव पोलीस स्टेशन हद्दीतील नांद गावात राहणारा विकास चौधरी बुधवारी संध्याकाळपासून बेपत्ता झाला होता. त्याच्या विवाहित प्रेयसी आणि तिच्या पतीने विकासची हत्या केल्यानंतर त्याच्या मृतदेहाचे सहा तुकडे केले. गुरुवारी रात्री दीपनगरमधील मेघी गावाजवळ विकास चौधरीचा कापलेला हात आणि पाय सापडला. यानंतर मोठी खळबळ उडाली.
दरम्यान, दीपनगरच्या सिपाह गावात असलेल्या पाचणे नदीतून मृतदेह तर पाटण्याच्या पुनपुन नदीत गोणीत डोके सापडले. याप्रकरणी पोलिसांनी विवाहित प्रेयसीला ताब्यात घेतले असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. विकासची प्रेयसी ज्योती देवी आणि तिचा पती रंजन यांनी याबाबतची कबुली दिली.
बिहारमधील रामचंद्रपूर येथे ज्योती देवी हिच्या माहेरी भाड्याने खोली घेऊन विकास शिक्षण घेत होता. त्यादरम्यान दोघेही प्रेमात पडले. दरम्यान, दोघांचेही लग्न झाले. विकासला एक मुलगा आहे, तर बाराखुर्द, नूरसराय येथील रंजन कुमारची पत्नी ज्योती हिलाही दोन मुले आहेत. या दोघांच्या लग्नानंतरही त्यांचे प्रेमसंबंध सुरुच होते.
हेही वाचा - श्रद्धा हत्याकांड पाहून रचला प्लॅन; आई अन् मुलाने मिळून वडिलांना मारलं, मग मृतदेहाचे 6 तुकडे केले अन्...
डीएसपी सदर डॉ. शिबली नोमानी यांनी सांगितले की, या जोडप्याला ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. हत्येनंतर वेगवेगळ्या ठिकाणी फेकलेल्या प्रियकर विकासच्या मृतदेहाचे सहा तुकडे पोलिसांनी जप्त केल्याचे त्यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Crime news, Murder, Women extramarital affair