निलेश पवार, नंदुरबार, 14 सप्टेंबर : नंदुरबारमध्ये गेल्या 45 दिवसांपासून सुरु असलेल्या एका बापाच्या लढ्याची दखल अखेर प्रशासनाला घ्यावी लागली आहे. आपल्या मुलीवर बलात्कार झालाय, तिची हत्या करण्यात आलीय. तिच्या शवविच्छेदन अहवालात खून आणि बलात्काराची माहिती लपवली गेलीय. तिची आत्महत्या दाखवली गेलीय. ही माहिती चुकीची आहे. तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमांना अटक करा. माझ्या मुलीला न्याय द्या, असा आक्रोश करणाऱ्या वडिलाची गेल्या दीड महिन्यापासून पोलीस आणि प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. पण पीडितेच्या वडिलांनी हार मानली नाही. जोपर्यंत मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत तिच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार करणार नाही, अशा पवित्रा मृतक मुलीच्या वडिलांनी घेतला. त्यांनी आपल्या मुलीचा मृतदेह गेल्या 45 दिवसांपासून मिठात पुरुन ठेवला होता. अखेर त्यांच्या या लढ्याची दखल प्रशासनाला घ्यावी लागली आहे. पोलीस आरोग्य पथकासह घटनास्थळी दाखल होत आहेत. संबंधित घटना ही नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील आहे. पीडित मुलीचं नाव आम्ही काही कारणास्तव सांगू शकत नाहीत. पीडितेच्या वडिलांनी आपल्या मुलीवर बलात्कार आणि तिची हत्या झाल्याचा आरोप केला होता. त्यांनी प्रशासनाकडे आपल्या मुलीच्या मृतदेहाचं शवविच्छेदन मुंबईत केलं जावं, अशी मागणी केली होती. वडिलांच्या मागणीला गावकऱ्यांचं देखील समर्थन होतं. त्यामुळे प्रशासन आणि पोलिसांना त्यांच्या मागणीची दखल घ्यावी लागली आहे. ( बुलढाण्यात किडनॅप करण्याचा कट उधळला, दोन बड्या हस्तींचा अपहरणाचा होता प्लॅन ) पीडितेच्या कुटुंबियांच्या मागणीनुसार आता तिच्या मृतदेहाचं पुन्हा शवविच्छेदन केलं जाणार आहे. मृतक मुलीच्या मृतदेहावर मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात पुन्हा शवविच्छेदन केलं जाणार आहे. पोलिसांनी आरोग्य प्रशासनाच्या मदतीने मुंबईत पुन्हा शवविच्छेदन करण्याची कार्यवाही पूर्ण केली आहे. नंदुरबारमध्ये अशाप्रकारे मृतदेह 45 दिवस सोबत ठेवणे आणि आता 45 दिवसांनी शवविच्छेदनाकरता मुंबईला पाठवने ही मोठी आणि पहिली घटना आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.