Home /News /crime /

Washim Crime : पत्नीसोबत भांडणाचा राग, वाशिममध्ये निर्दयी बापाचं काळीज पिळवटून टाकणारं कृत्य

Washim Crime : पत्नीसोबत भांडणाचा राग, वाशिममध्ये निर्दयी बापाचं काळीज पिळवटून टाकणारं कृत्य

आई-वडिलांचं आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. पण काही आई-वडील या सर्व गोष्टींना अपवाद असतात.

वाशिम, 26 मे : आपले आई-वडील हे आपल्या आयुष्याचे अविभाज्य घटक असतात. ते आपल्याला लहानपणापासून काय हवं-नको ते पाहतात, आपल्यासाठी खूप कष्ट करुन आपलं शिक्षण करतात. आपल्याला आपल्या पायांवर उभं करतात. ते आपल्याला आपल्या पायांवर उभं करण्यासाठी त्यांचं आयुष्य पणाला लावतात. वेळप्रसंगी ते तहान-भूक हरपून आपल्यासाठी कष्ट करतात. त्यामुळे आई-वडिलांचं आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. पण काही आई-वडील या सर्व गोष्टींना अपवाद असतात. अर्थात अगदी हाताच्या बोटावर मोजणारी अशी अपवादात्मक माणसं आपल्याला समाजात वावरताना दिसतील. पण असा पायंडा पडायला नको. कारण ते लहान मुलं आणि समाजासाठी घातक आहे. वाशिममध्ये अशीच एक अपवादात्मक, अनपेक्षित आणि वाईट घटना समोर आली आहे. एका पित्याने आपल्या पत्नीसोबत भांडण झालं म्हणून पोटच्या लेकरांना उपाशीपोटी रेल्वे स्थानकावर सोडलं. खायला घेऊन येतो असं सांगून तो निर्दयी बाप परत लेकरांना घेण्यासाठी रेल्वे स्थानकावर गेलाच नाही. पण सुदैवाने काही घटना अशा घडल्या की त्या लेकरांची पुन्हा आपल्या आईसोबत भेट झाली. नेमकं प्रकरण काय? पती-पत्नीच्या वादामधून रागाच्या भरात एका निर्दयी बापाने उपाशीपोटी असलेल्या आपल्या पोटच्या दोन लहान चिमुकल्यांना रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर सोडलं. निर्दयी बाप आपल्या मुलांना खायला घेऊन येतो असं सांगून तिथून पळून गेला. संबंधित घटना ही वाशिम जिल्ह्यातील जऊळका रेल्वे स्टेशन येथे घडली. या प्रकरणी धोत्रा येथील सखाराम जाधव यास पोलिसांनी ताब्यात घेत चिमुकल्यांना आपल्या नातेवाईकांच्या स्वाधीन केलंय. (परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर ईडीची धाड, परबांच्या संबंधित सात मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी) वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील वरदरी येथे सासरवाडी असलेल्या सखाराम जाधव याने पत्नीसोबत भांडण केले. त्यानंतर आपल्या साहिल (6 वर्षे) आणि आदित्य (8 वर्षे) या दोन मुलांना सोबत घेऊन तो पुणे येथून घरी धोत्रा आला. तिथून तो आज सकाळी पूर्णा-अकोला पॅसेंजरने आपल्या दोन चिमुकल्यांसह जऊळका रेल्वे स्टेशनवर उतरला. त्याने आपल्या दोन्ही लहान मुलांना प्लॅटफॉर्मवरील बाकावर बसविले. त्यानंतर तो दोन्ही मुलांना खाऊ आणण्यासाठी जातो असं सांगून तिथून निघून गेला. अखेर बराच वेळ होऊनही वडील न आल्याने दोघेही भाऊ रडायला लागले. संबंधित घटनेची माहिती निर्भया पथकाला आणि गावातील पोलीस पाटील विजय सरोदे यांना मिळाली. त्यांनी तातडीने रेल्वे स्टेशनवर धाव घेत मुलांची शहानिशा केली. त्यांनी उपाशी असलेल्या मुलांना पाणी व जेवण दिले. त्यानंतर माणुसकीला काळीमा फासणाऱ्या बापाचा निर्भया पथकाच्या पोलीस महिला कर्मचारी शितल सरनाईक आणि पोलीस निरीक्षक अजिनाथ मोरे यांनी अवघ्या काही तासातच शोधून काढले. अखेर पोलिसांनी मुलांना वडील आणि मामांच्या स्वाधीन केलं.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या