पुणे, 18 ऑगस्ट : अखेर दीड महिन्याच्या तपासानंतर पुणे ( pune ) पोलिसांनी मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल असून फरार झालेले पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती गणेश गायकवाड आणि नानासाहेब गायकवाड (Ganesh Gaikwad and Nanasaheb Gaikwad) यांना उडपीमधून अटक केली आहे. पत्नीला सिगारेटचे चटके देऊन मारहाण केल्या प्रकरणी त्यांच्यावर पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर बलात्कार खंडणी आणि जीवे मारण्याच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल झाले होते. पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी गायकवाड कुटुंबावर मोक्कानुसार कारवाई केली आहे. दोघेही दीड महिन्यापासून फरार होते. गायकवाड कुटुंबीयांची औंधमध्ये कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. (Famous industrialists from pune Ganesh Gaikwad and Nanasaheb Gaikwad father and son finally arrested)
गायकवाड पिता-पुत्रांवर आठ गुन्हे दाखल
नाना गायकवाड आणि गणेश गायकवाड यांच्यावर एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये दंगा करुन खुनाचा प्रयत्न करणे, गुलाम बनविण्याच्या इराद्याने अपहरण करुन मारहाण करणे, कट रचून बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करणे, खंडणी उकळण्यासाठी मारहाण करणे, दरोडा घालणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. संबंधित गुन्हे हे पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी, सांगवी, पुणे शहरातील चतुर्श्रुंगी, चंदननगर आणि पुणे ग्रामीण पौड पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत.
हे ही वाचा-मनसे Vs संभाजी ब्रिगेड वाद पेटला, आजोबांची पुस्तकं पाठवली 'कृष्णकुंज'वर!
नेमकं काय आहे प्रकरण?
पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि राजकारणी गणेश गायकवाड यांनी ज्योतिषी रघुनाथ येमूल याच्या सल्ल्यानुसार पत्नीवर अघोरी प्रथांचा वापर करुन छळ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. गणेश गायकवाड याने आपल्या 27 वर्षीय पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची तक्रार स्वत: पीडित महिलेने पोलीस ठाण्यात केली होती. पतीने अघोरी प्रकाराने ठार मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप फिर्यादी महिलेने केला होता. विशेष म्हणजे गणेश गायकवाड याची पत्नी एका माजी आमदारांची मुलगी आहे. तीन वर्षांपूर्वी 2017 मध्ये त्यांचे लग्न झाले होते.
कोण आहे गणेश नानासाहेब गायकवाड?
गणेश गायकवाड हा पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक असून औंध परिसरात राहतो. त्याचे पाणाष आणि बाणेर परिसरात अनेक ठिकाणी मालमत्ता आहे. या भागात त्याने मॉल्स, आयटी कंपन्या, दुकानं यांना आपल्या जमिनी भाडे तत्वावर दिल्या आहेत. त्यातून गायकवाड याला दर महिन्याला तब्बल अडीच ते तीन कोटी उत्पन्न मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी त्याने भाजपला रामराम करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पिंपरी-चिंचवडचे भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप हे गणेश गायकवाड याचे जवळचे नातेवाईक आहेत.
येमुल गुरुजींनी दिला सल्ला...
येमुल याने गायकवाड कुटुंबाला तुमची सून अवदसा असून पांढर्या पाय गुणांची आहे. तिची जन्मवेळ चुकीची आहे, त्यामुळे ग्रहमान दूषित झाले आहेत. जर तुझी ही बायको म्हणून अशी कायम राहिली तर तू आमदार होणार नाही, मंत्री होणार नाहीस त्यामुळे तिला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे, मी देतो ते लिंबू उतरविल्यावर तुझ्या मागची पिडा कायमची निघून जाईल, असे पिडितेचा पती गणेशला सांगितले. त्यानंतर पती गणेश याने आपल्या पत्नीवरून लिंबू ओवाळून टाकल्याचा प्रकार घडला. यामुळे संसार मोडण्यासाठी अनिष्ठ रूढी परंपरा अघोरी कृत्याचा वापर झाल्याच्या कारणावरून येमुल गुरूजीस अटक करण्यात आली आहे. येमुल गुरूजीचे राजकीयपासून प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकार्यांशी नजीकचे संबंध आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business, Crime news, Pune