वलसाड (गुजरात), 8 सप्टेंबर : अलीकडच्या काळात गुन्हेगारीचं (Crime) प्रमाण वाढलं आहे. त्याचप्रमाणे गुन्हे करण्याची पद्धतही बदलत आहे. गुन्हे करण्यासाठी गुन्हेगार नवनवीन क्लृ्प्त्यांचा वापर करताना दिसतात. मात्र, पोलीस अत्यंत परिश्रमपूर्वक अशा गुन्ह्यांची उकल करतात आणि सत्य उजेडात आणतात. गुन्ह्याची उकल सहज होत नसेल तर पोलिसांनाही काही वेळा वेगवेगळ्या युक्त्या (Idea) वापराव्या लागतात. सध्या गुजरातमधल्या वलसाड येथील एक हत्या प्रकरण (Murder Case) जोरदार चर्चेत आहे. सर्व बाजूने तपास सुरू असूनही या प्रकरणाची उकल होत नाही, हे लक्षात आल्यावर पोलीस गुन्हेगाराशी खोटं बोलले. पोलिसांच्या या क्लृप्तीनं आरोपीला गुन्हा कबूल करण्यास भाग पाडलं आणि घटनेमागची सत्य कहाणी समोर आली. ‘आज तक’ने याविषयीचं वृत्त दिलं आहे. गुन्हा केल्यानंतर प्रत्येक गुन्हेगार खोटं बोलत असतो. मात्र खऱ्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांनादेखील कधीकधी खोटं बोलावं लागतं. वलसाडमधल्या खून प्रकरणाचं रहस्य उलगडण्यासाठी पोलिसांनी खोटं बोलताच गुन्हेगारानं सर्व सत्य पोलिसांना सांगितलं. गुजरातमधल्या वलसाड शहरातल्या पारदी भागातील नदी किनारी 28 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी एका कारमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला. निर्मनुष्य ठिकाणी उभ्या असलेल्या कारमधील मागच्या सीटवर हा मृतदेह होता. त्यानंतर काही लोकांनी पोलिसांना फोन केला. पोलीस घटनास्थळी पोहोचताच कार आणि मृतदेहाची अवस्था पाहून हे हत्या प्रकरण असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. कारण मृतदेहाचा गळा दाबल्याच्या खुणा दिसत होत्या. तसंच मृतदेह ज्याप्रकारे कारमध्ये ठेवला होता त्यावरून हा नैसर्गिक मृत्यू (Natural Death) नसल्याचंही दिसत होतं. तसंच कारची किल्ली आणि महिलेचा मोबाईल गायब करण्यात आला होता. ( नागपूर : महिला बीडीओ अधिकाऱ्याने कंत्राटी कर्मचाऱ्यालाच मागितली लाच…; वाचा तरुणीने पुढे काय केलं? ) पोलिसांनी महिला बेपत्ता झाल्याविषयी शोध घेण्यास सुरुवात केली. योगायोगानं आदल्यादिवशी रात्री वलसाड शहरातील एका व्यक्तीनं त्याची पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. “माझी पत्नी 27 ऑगस्ट रोजी कोणाला तरी भेटायला जाते, असं सांगून घराबाहेर पडली. त्यानंतर तिचा मोबाईल फोन स्विच ऑफ झाला आणि ती घरीही परतली नाही”, असं हरेश बलसारा यांनी तक्रारीत नमूद केलं होतं. त्यानंतर पोलिसांनी हरेश यांच्याशी संपर्क करून पारदीतील नदीकिनारी सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी घटनास्थळी बोलावलं. पत्नीची कार आणि तिचा मृतदेह पाहून हरेश यांना रडू कोसळलं. त्याचवेळी हा मृतदेह हरेशच्या पत्नी वैशाली बलसारा यांचा असल्याचं पोलिसांना समजलं. दरम्यान पोलिसांसह आजूबाजूच्या लोकांनीही हरेश आणि त्यांची पत्नी वैशाली यांच्याबद्दल समजलं होतं. कारण वैशाली ही प्रसिद्ध गरबा गायिका (Garba Singer) होती आणि तिचा पती हरेश हे प्रसिद्ध गिटारिस्ट आहे. त्यानंतर पोलिसांनी वैशाली यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पण ही हत्या कशी झाली, त्यामागे कारणं काय आहे? आदी प्रश्नांचा शोध पोलिसांनी सुरू केला होता. पोलिसांनी टेक्निकल सर्व्हिलन्सच्या (Technical Surveillance) मदतीनं तपास सुरु केला. सीडीआर (CDR) अर्थात कॉल रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु केली. त्यात वैशाली याचं शेवटचं संभाषण बबिता नावाच्या महिलेशी झालं असल्याचं आढळलं. सीडीआरमध्ये वैशाली याचं बबिताशी झालेलं बोलणं आणि सीसीटीव्हीत बबिता फॅक्टरीकडे जाताना दिसून आली नसती तर वैशाली यांच्या मृत्यूचं गूढ उकललं नसतं. मात्र वलसाड पोलिसांनी अत्यंत चातुर्यानं या गुन्ह्याची उकल केली. ( शाळा-कॉलेजमध्ये Food App वरून पोहोचवायचे ड्रग्स, 8 तरुणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या ) दरम्यान पोलिसांनी हरेश बलसारा (Haresh Balsara) यांची चौकशी सुरू केली. परंतु, यातून फारसं काही निष्पन्न झालं नाही. शनिवारी वैशाली कोणाला तरी भेटायला जाते असं सांगून घरातून बाहेर पडली पण ती कुठं चालली आहे, कोणाला भेटणार आहे याविषयी काही सांगितलं नसल्याचं हरेश यांनी पोलिसांना सांगितलं. चौकशीदरम्यान हरेश काही गोष्ट लपवत नसल्याचा, अंदाज पोलिसांना आला होता. चौकशीनंतर एका अर्थाने वैशाली यांचा पती हरेश संशयाच्या कक्षेबाहेर होता. पण वैशाली यांच्या अज्ञात शत्रूचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर कायम होतं. पोलिसांनी टेक्निकल सर्व्हिलन्सच्या मदतीनं तपासला गती दिली. आठ पथकांची स्थापना करत त्यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या. त्यानंतर पोलिसांनी सीडीआर आणि वैशाली यांच्या घरापासून ते घटनास्थळापर्यंत असलेल्या सीसीटीव्हीचं फुटेज स्कॅनिंग सुरू केलं. यातून पोलिसांना दोन पुरावे मिळाले. घरातून बाहेर पडताना वैशाली याचं फोनवर बबिताशी अखेरचं बोलणं झाल्याचं सीडीआरमध्ये स्पष्ट झालं. त्यानंतर घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात 27 तारखेला बबिताच्या हालचाली दिसून आल्या. या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जुळत होत्या. त्यानंतर पोलिसांनी बबिताची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. बबिता वैशाली यांची मैत्रीण होती. पण बबिता नऊ महिन्यांची गर्भवती असल्याने संशयित असूनही तिची चौकशी करण्यात अडचणी होत्या. पोलिसांनी वैद्यकीय अडचण लक्षात घेत एका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या उपस्थितीत बबिताची चौकशी सुरू केली. तांत्रिक पुरावे आणि बबिताची वर्तणूक पाहून तिचा या हत्येत हात असल्याची खात्री पोलिसांना झाली. प्रथम 27 तारखेला मी पारदी परिसरात गेले नसल्याचे बबितानं सांगितलं. पण पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज दाखवताच तिनं होकार दिला. त्यादिवशी रात्री मी पारदी परिसरात गेले होते. त्यावेळी माझी वैशालीशी भेट झाली,असं तिनं सांगितलं. त्यावेळी वैशालीसोबत आणखी कोण होतं? असा प्रश्न विचारताच बबितानं पटकन सांगितलं की कारमध्ये तिच्यासोबत दोन व्यक्ती होत्या. त्यानंतर पोलिसांनी बबिताला मुद्दाम या प्रकरणाशी संबंध नसलेल्या काही लोकांचे फोटो दाखवले. पोलिसांना बबिताकडून सत्य जाणून घ्यायचं होतं पण ती या प्रकरणातून सहीसलामत सुटण्याचा प्रयत्न करत होती. त्यानंतर तिनं वैशाली सोबत असलेल्या एका व्यक्तीला ओळखलं. पण ती खोटं बोलत असल्याचं यातून स्पष्ट झालं. यानंतर तिला पोलिसांनी सत्य सांगितलं आणि ती तिच्याच खोट्या गोष्टींमध्ये अडकली होती. बबिताने ओळखलेल्या व्यक्तीनं मी वैशाली यांना ओळखत नसल्याचं सांगितलं. या सर्व प्रकरानंतर बबितानं आपला गुन्हा (Crime) कबूल केला आणि हत्येमागची सर्व कहाणी सांगितली. बबिताने वैशालीचा खून का केला? बबिता आणि वैशाली एकमेकींना एक वर्षापासून ओळखत होत्या. त्या दोघी चांगल्या मैत्रिणी होत्या. दरम्यान बबिताला पैशांची गरज होती. त्यामुळे वैशाली यांनी बबिताला वेगवेगळ्या वेळी 25 लाख रुपये उधार दिले होते. हे पैसे वैशाली परत मागत होत्या. पण बबिताला हे पैसे बुडवायचे होते. त्यामुळे हळूहळू या दोघींच्या नात्यात कटुता येऊ लागली होती. त्यामुळे बबितानं वैशाली यांची हत्या केली. मात्र हे कृत्य एकट्या बबिताला करणं शक्य नव्हतं. या प्रकरणात अजून काही लोक सामील होते. बबितानं तिच्या काही फेसबुक फ्रेंड्सना (Facebook Friends) विश्वासात घेत त्यांना ही कहाणी ऐकवली. “मला आता वैशालीपासून सुटका हवी आहे. कारण मला तिचे 25 लाख परत करायचे नाहीत आणि त्यासाठी तिचा खून करायचा आहे”, असं तिनं फ्रेंड्सना सांगितलं. बबिताचे हे फ्रेंड्स सुपारी किलर्स होते. ते वैशालीची हत्या करण्यास तयार झाले. पण त्यांनी यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केली. बबिताने तडजोड करत आठ लाख रुपये देण्याचं कबूल करत वैशाली यांची हत्या करण्यास सांगितलं. ठरल्यानुसार, 27 ऑगस्टला रात्री बबिता आणि दोन सुपारी किलर्स (Supari Killers) वलसाडमधली पारदी परिसरात एका ओसाड डायमंड कारखान्यात पोहोचले. यावेळी बबिताने वैशाली यांना पैसे परत देणार असल्याचं खोटं सांगत त्यांना या कारखान्यात बोलावलं. बबिता घरातून स्कुटीवरून कारखान्याकडे निघाली. पण अटकेच्या भीतीनं तिनं कारखान्यापासून सुमारे एक किलोमीटर अलीकडे स्कूटी उभी केली आणि टॅक्सीने कारखान्यात पोहोचली. तिथं तिनं सुपारी किलर्ससोबत हत्येचं प्लॅनिंग केलं. बबिताचा फोन आल्यावर वैशाली पैसे घेण्यासाठी सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचल्या. त्यानंतर बबिता वैशाली यांच्या कारमध्ये बसून त्यांच्याशी संभाषण करू लागली. त्यानंतर तिथं उभे असलेले सुपारी किलर्स हे आपले भाऊ असल्याचं सांगत बबितानं त्यांना वैशाली यांच्या कारमध्ये बसण्यास सांगितलं. त्यानंतर त्यांनी क्लोरोफॉर्मच्या मदतीनं वैशाली यांना बेशुद्ध केलं. त्यानंतर गळा दाबून त्यांची हत्या केली. पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह कारमध्ये ठेवून ती नदी किनारी नेली आणि मृतदेह बेवारस सोडत ते फरार झाले. या सर्व प्रकरणात वैशाली यांनी बबिताला 25 लाख रुपये दिल्याची माहिती हरेश यांच्यापासून लपवून ठेवली होती. वैशालीकडे एवढी मोठी रक्कम कोठून आली याची माहिती हरेश यांना नव्हती. हत्येच्या दिवशी बबिताने पैसे परत करण्याच्या बहाण्याने वैशाली यांना फोन केला तेव्हादेखील वैशाली यांनी आपल्या पतीला 25 लाखांविषयी सांगितलं नाही. त्यामुळे हरेश यांनी पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार देताना याविषयी काही सांगितलं नाही. हत्येवेळी बबिता आठ लाख रुपये घेऊन आली होती. तिनं वैशालीपासून सुटका करून घेण्यासाठी ते आठ लाख रुपये सुपारी म्हणून किलर्सना दिले. पोलिसांनी बबितासोबत पंजाबमधून एका सुपारी किलरला अटक केली असून दुसऱ्या किलरचा शोध सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.