चंडीगड, 04 मार्च: चंडीगडमधल्या (Chandigarh) एका व्यक्तीला फेसबुकवर (Facebook) परदेशी महिलेशी मैत्री करणं भलतंच महागात पडलं. या महिलेचं फेसबुक अकाउंट बनावट (Fake Facebook Account) होतं. मात्र तिच्या जाळ्यात ही व्यक्ती अडकली आणि महिलेनं त्याला आठ लाखांहून अधिक रुपयांना गंडा घातला. या प्रकरणी तक्रारीवरुन सायबर सेलनं तीन आफ्रिकन (African) नागरिकांना अटक केली आहे. चंडीगड पोलिसांच्या सायबर सेलनं (Cyber Cell) टीना फ्रान्सिस या महिलेच्या नावानं असलेल्या बनावट फेसबुक प्रोफाईलद्वारे स्थानिक रहिवाशाची 8.72 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी घाना प्रजासत्ताक, आयव्हरी कोस्टसह पश्चिम आफ्रिकी देशांतील तिघांना अटक केली आहे. या आरोपींना दिल्लीतील पालम येथील राज नगरमधून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनी माजरा येथील रहिवासी यशवीर सिंह (Yashveer Singh) याने तीन महिन्यांपूर्वी फेसबुकवर टीना फ्रान्सिस नावाच्या महिलेशी मैत्री केली होती. टीनाने त्याला यूकेतून एक महागडी भेटवस्तू पाठवत असल्याची बतावणी केली. मात्र त्याचा कस्टम चार्ज (Custom Charge) तू भरावा असं सांगितलं. काही दिवसांनंतर यशवीर सिंह याला एका महिलेचा फोन आला. या महिलेनं आरबीएल बॅंकेची प्रतिनिधी असल्याचं भासवत त्याला बॅंक खात्यात एक ठराविक रक्कम जमा करण्यास सांगितलं. यशवीरने अनेक खात्यांमध्ये पैसे जमा केले, पण त्याला कोणतीही भेटवस्तू मिळाली नाही. टीना फ्रान्सिस ही महिला या संपूर्ण घडामोडींदरम्यान माझ्या सतत संपर्कात होती, असं यशवीरनं पोलिसांना सांगितलं. हे वाचा- पोलीस व्हायचं स्वप्न बाळगलं पण परिस्थितीनं केला घात, साताऱ्यात तरुणीचा भयावह अंत गिडॉन सेबॅस्टियन (वय 42), घानाचा क्लेमेंट अफुल (वय 33), आणि आयव्हरी रिपब्लिकमधील मोईस (वय 30) अशी या प्रकरणातील आरोपींची नावं आहेत. या आरोपींना न्यायलयात हजर केलं असता, त्यांना न्यायलयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या संशयित आरोपींकडून 23 मोबाईल फोन, 23 सिमकार्ड, विविध बॅंकांची 40 एटीएम कार्ड, 8 पासबुक, 4 चेकबुक, 5 वाय-फाय हॉटस्पॉट, 1 डोंगल आणि 4 लॅपटॉप जप्त करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. हे वाचा- वाहतूक पोलिसांचा अजब कारभार;हेल्मेट घातले नाही म्हणून रिक्षाचालकालाच ठोठावला दंड सूत्रांच्या हवाल्यानं मीडिया रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींचा देशाच्या विविध भागात नोंद असलेल्या फसवणुकीच्या 50हून अधिक गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचा संशय आहे. गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेल्या आणि जप्त केलेल्या मोबाईलचे आयएमईआय क्रमांक (IMEI Number) सर्व राज्यांच्या पोलिसांच्या एका सामाईक पोर्टलवर अपलोड केले जातील. यातून हे फोन इतर ऑनलाइन गुन्ह्यांसाठी वापरले गेले होते की नाही, हे पोलिसांना समजू शकेल, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.