हुक्केरी, 28 मार्च: शेतीतील बांधावरून शेतकऱ्यांमध्ये वाद (Disputes over agricultural land) होणं नवीन नाही. यापूर्वी अनेकदा अशा घटना समोर आल्या आहेत. पण हा शेतीतील वाद विकोपाला गेल्यानंतर काय होऊ शकतं याची प्रचिती नुकतीच आली आहे. शेताच्या बांधावरून झालेल्या वादातून एका शेतकऱ्याची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आली आहे. 72 वर्षीय शेतकरी आप्पासाहेब कृष्णा उंदुरे असं मृत शेतकऱ्याचं नाव असून विष्णू मल्लाप्पा उंदुरे असं संशयित आरोपीचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असून या प्रकरणाची पुढील चौकशी केली जात आहे. संबंधित घटना कर्नाटक राज्याच्या हुक्केरी तालुक्यातील मत्तीवाडे येथील आहे. येथील एका 72 वर्षीय वयोवृद्ध शेतकऱ्याची खुरप्याने वार करून हत्या करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी साडे चारच्या सुमारास घडली. मृत आप्पासाहेब उंदुरे आणि आरोपी विष्णू उंदुरे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शेतीतील बांधावरून वाद सुरू आहे. मागील काही दिवसांत यांच्यात छोटे मोठे खटके उडाले आहेत. पण शुक्रवारी त्यांच्यात झालेल्या वादाच रुपांतर हिंसेत झालं आहे. (हे वाचा - लेकराला नाही घेऊ शकले लॅपटॉप, हताश बळीराजानं उचललं टोकाचं पाऊल ) त्यामुळे संतापलेला शेजारचा शेतकरी विष्णू उंदुरे याने रागाच्या भरात आप्पासाहेब उंदुरे यांच्यावर खुरप्याने वार केला. या हल्लात मृत आप्पासाहेब गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने गडहिंग्लज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण तोपर्यंत फार उशीर झाला त्यामुळे उपचारापूर्वीचं त्यांचा मृत्यू झाला आहे. दैनिक पुढारी ने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी विष्णू मल्लाप्पा उंदुरे यांनी मृत आप्पासाहेब उंदुरे यांच्यावर खुरप्याने वार करून त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत केली. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. या घटनेची माहिती मिळताच, संकेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. या घटनेची फिर्याद मृत शेतकऱ्याचा मुलगा लक्ष्मण आप्पासाहेब उंदुरे यांनी दिली आहे. या प्रकरणी संकेश्वर पोलीस पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.