तिरुवल्लूर, 20 ऑगस्ट : तामिळनाडूतील तिरुवल्लूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे रेल्वे ट्रॅकजवळ एका तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. रेल्वे कर्मचाऱ्याने महिलेचा मृतदेह रुळावर पाहिल्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती दिली. या तरुणीच्या मृतदेहाची ओळख झाली असून हा मृतदेह 29 वर्षीय मेगाश्री या तरुणीचा आहे. तसेच ती IIT मद्रासची विद्यार्थिनी असल्याचे सांगण्यात येत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी तिरुवल्लूर जिल्ह्यातील अवाडी भागात रेल्वे ट्रॅकजवळ तरुणीचा मृतदेह आढळला होता. अवाडी क्षेत्र हे तिरुवल्लूरच्या बाहेरील भागात आहे. रेल्वे कर्मचाऱ्याला ट्रॅकच्या तपासणीदरम्यान हा मृतदेह आढळला. यानंतर कर्मचाऱ्याने तत्काळ ही बाब रेल्वे पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी किलपॉक मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवला. पोलीस केलेल्या तपासात समोर आले आहे की, या तरुणीचे नाव मेगाश्री (वय - 29) आहे. ती आयआयटी मद्रासची विद्यार्थिनी आहे. मेगाश्री आयआयटी मद्रासमधून तीन महिन्यांचा रिसर्च प्रोग्राम करत होती. मेगाश्रीच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमा आढळल्या आहेत. मेगाश्री आपल्या कॉलेजपासून इतक्या दूर आवाडीत कशी पोहोचली? मृत तरुणी रेल्वेतून तर पडली नाही ना, मेगाश्रीच्या मृत्यूमागे आणखी कुणाचा हात आहे का, या सर्व बाबींचा तपास पोलीस करत आहेत. हेही वाचा - मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर, लाखोंचा पगार; लव्ह मॅरेजच्या 4 वर्षांनंतर तरुणीने संपवलं जीवन! दरम्यान, या घटनेची माहिती मेगाश्रीच्या कुटुंबीयांना देण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले. त्याचबरोबर मेगाश्रीच्या कुटुंबीयांकडूनही पोलीस माहिती घेत आहेत. तसेच महाविद्यालयातील मेगाश्रीच्या मित्रांकडूनही माहिती घेतली जात आहे. तर शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.