नागपूर, 25 मे : मुलीचं अन् वडिलांचं नातं अनोखं असतं. मुलीचा वडिलांवर सर्वाधिक जीव असल्याचं म्हटलं जातं. मात्र नागपुरात या नात्याला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. लेकीनेच जन्मदात्या बापाच्या हत्येचा कट रचला. यासाठी तिने 5 लाखांची सुपारीही दिली. वडिलांवर 19 सेकंदात 29 वार करीत संपवण्यात आलं. ही थरकाप उडवणारी घटना नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथे घडली आहे. सात दिवसांनी या हत्येमागील नेमकं कारणं समोर आलं. जे पाहून पोलिसांनाही धक्का बसला.
नागपूरातील भिवापूर येथे 17 मे रोजी सकाळी 9 वाजून 54 मिनिटांनी भिवापूर येथे हा थरकाप उडवणारा प्रकार घडला. 60 वर्षीय दिलीप सोनटक्के पेट्रोल पंपाचे मालक आहेत. ते दोन कर्मचाऱ्यांसोबत हिशोब करीत बसले होते. त्यावेळी दुचाकीवरुन तिघेजण पेट्रोल पंपाजवळ आले आणि सोनटक्के यांच्यावर सुऱ्याने सपासप वार केले. याशिवाय पेट्रोल पंपावरील 1 लाख 38 हजार पळवून नेले. यानंतर पोलिसांना बोलावण्यात आलं. प्राथमिक तपासात पैशांसाठी हत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
हत्यारांनी सांगितलं सत्य...
पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता दोघांची ओळख पटली आणि त्यांना ताब्यात घेण्यात आलं. तिसऱ्याचा शोध सुरू होता. मात्र दोन्हीही गुन्हेगार काहीही सांगण्यास तयार नव्हते. तर दुसरीकडे वडिलांची हत्या झाल्यानंतरही पत्नी किंवा मुलं यांनी वडिलांना कोणी मारलं, याची विचारपूसही करायला आले नव्हते. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला आणि सोनटक्के कुटुंबाची चौकशी सुरू केली. मृत दिलीप सोनटक्के यांचं वय 60 वर्षे असून पत्नी, मोठी मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. गेल्या वर्षभरापासून दिलीप सोनटक्के कुटुंबीयांना त्रास देत होते. हा वाद पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर त्यांनी घर सोडलं.सोनटक्के यांचे एका महिलेशी विवाहबाह्य संबंध होते. आणि सोनटक्के त्या महिलेसोबत दुसऱ्या फ्लॅटमध्ये राहत होते. दिलीप सोनटक्के यांची संपत्ती आपल्या हातातून जाईल अशी कुटुंबीयांना भीती होती. शिवाय विवाहबाह्य संबंधाचा रागही त्यांच्या मनात होता. यातून दिलीप सोनटक्के यांच्या मोठ्या मुलीने वडिलांच्या हत्येची पाच लाख रुपयांना सुपारी दिली.
कसा झाला उलगडा...
दिलीप सोनटक्के यांच्या मोठ्या मुलीचं लग्न झालं असून ती दिव्यांग आहे. सुरुवातीला तिने पोलिसांच्या प्रश्नांची उत्तर देण्यास टाळाटाळ केली. मात्र पोलिसांनी काही तांत्रिक तपास केला आणि त्या आधारावर मुलीला बोलतं केलं. शेवटी तिने वडिलांच्या हत्येची कबुली दिली. सोनटक्के यांच्या हत्येचा सूत्रधार म्हणून मोठ्या मुलीला अटक करण्यात आली आहे. याशिवाय सुपारी घेतलेल्या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Gang murder, Nagpur News