बांसवाडा, 17 फेब्रुवारी : राजस्थानच्या आदिवासी बहुल बांसवाडा (Banswara) जिल्ह्यात नात्यातील लज्जास्पद बाब समोर आली आहे. येथे कर्जात अडकलेल्या सासरच्या मंडळींनी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी सुनेला 7 लाखांचा करार (Deal) करून विकलं. सासरच्या मंडळींनी सुनेच्या इच्छेविरोधात जाऊन तिचं लग्न (Naata Marriage) करण्याचा प्रयत्न केला. सुनेने जेव्हा याचा विरोध केला तर तिला मारहाण केली. शेवटी सुनेने सासरच्यांविरोधात जाऊन पोलिसांकडून मदत मागितली. मात्र त्यांनीही मदत केली नसल्याने ती कोर्टात गेली. कोर्टाच्या आदेशानंतर सासरच्या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बांसवाडातील खमेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पोलिसांनी सांगितलं की, रेणुकाने या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. ती सध्या आपल्या माहेरी राहत आहे. महिलेने आपल्या तक्रारीत सांगितलं की, तब्बल 7 वर्षांपूर्वी तिचं गोपाळसोबत लग्न झालं होतं. लग्नात वडिलांनी मोठ्या प्रमाणात हुंडा दिला होता. त्यांना एक मुलगीही आहे ती सध्या 4 वर्षांची आहे.
दागिने विकले, जमिनही कर्जाऊ दिली...
एकेदिवशी तिचा पती आंब्याच्या झाडावरुन खाली पडला. यात तो गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान तब्बल 3 महिने तो कोमात होता. गोपाळच्या उपचारासाठी दागिने विकले. जमीनदेखील कर्जाऊ दिली. संपूर्ण कुटुंबावर कर्ज झालं. पुढे रेणुकाने सांगितलं की, यानंतर पैशांसाठी सासरच्या मंडळींनी तिचं लग्न दुसऱ्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला. 7 लाखात त्यांनी रेणुकाचा करार केला. मात्र तिने याला नकार दिला. यानंतर तिला सासरच्या मंडळींनी मारहाण केल्याचंही तिने सांगितलं.
हे ही वाचा-पुण्यातील महिलेचा बाथरूममध्ये आढळला मृतदेह, 10 दिवसांनंतर धक्कादायक माहिती उघड
यानंतर ती माहेरी निघून गेली. पोलिसांसमोर दोन्ही पक्षांमध्ये एक बैठकही झाली. मात्र यानंतर चार आरोपी तिच्या माहेरी आले व मारहाण केली. शेवटी रेणुकाने कोर्टाचं दार ठोठावलं. आता पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marriage, Money debt, Rajasthan