मुंबई,14 जुलै: विवाहबाह्य संबंध (Extra Marital Affair) किंवा प्रेम संबंधातून (Love Affair) कुटुंबीय किंवा जमावाकडून मारहाण झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. अशा प्रकारची घटना गुजरातमधील दाहोद (Dahod) जिल्ह्यातील खजुरी गावात घडली आहे. मात्र व्हिडीओ व्हायरल (Viral) झाल्याने ही घटना उजेडात आली आहे. दाहोद जिल्ह्यातील खजुरी गावातील एका 23 वर्षीय विवाहित महिलेने विवाहबाह्य संबंध ठेवल्याचे समजताच तिच्या सासरकडील मंडळींनी गावकऱ्यांसमोर तिचे कपडे फाडले, तिचा अपमान केला आणि पतीला खांद्यावर उचलून घेण्यास भाग पाडले. धनपूर तालुक्यात 6 जुलै रोजी ही घटना घडली असून, याबाबत या पिडीत महिलेने तक्रार (Complaint) दाखल केली आहे. या भागात प्रेम संबंध किंवा विवाहबाह्य संबंधामुळे अशा प्रकारची घडलेली ही दुसरी घटना आहे. या वर्षी मे महिन्यात पंचमहाल जिल्ह्यात प्रेमसंबंधाच्या संशयावरुन जोडप्याला झाडाला बांधून मारहाण केल्याची घटना उजेडात आली होती, असं टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटलं आहे. याबाबत अधिक माहिती अशी, खजुरी गावातील एका महिलेचे विवाहबाह्य संबंध होते. ती आपल्या प्रियकरासोबत पळून गेली होती. या घटनेची माहिती महिलेचा पती आणि त्याच्या कुटुंबियांना समजली. त्यानंतर त्यांनी महिलेचा शोध घेऊन, तिला परत गावी आणले. गावी परत आणल्यावर ग्रामस्थांसमोर तिला लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच या महिलेचे कपडे फाडण्यात आले आणि ग्रामस्थांनी देखील तिला धमकावले. ही घटना 6 जुलै रोजी घडली. सोमवारी या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी (Police) या घटनेचा तपास सुरु केला असून, खजुरी गावात ही घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे. (हे वाचा: प्रेयसी आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडून पळून गेला प्रियकर ) पोलिस अधीक्षक कानन देसाई यांनी या घटनेत 19 आरोपी सामील असल्याचे स्पष्ट झालं असल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या नावांची नोंद करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील 19 पैकी 11 आरोपींना अटक करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. मला गावात आणल्यानंतर धक्काबुक्की आणि लाठीकाठ्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच माझे कपडे फाडण्यात आले. पतीला खांद्यावर उचलून घ्यायला लावले आणि ग्रामस्थांनी देखील माझ्याशी गैरवर्तन करुन मला धमकावले, अशी तक्रार पिडीत महिलेने पोलिसांत दाखल केली आहे. ही तक्रार दाखल केल्यानंतर पिडीत महिलेची वैद्यकीय तपासणी (Medical Examination) करण्यात आली आहे. (हे वाचा: महिलेच्या गळ्यातील सोनं चोरणं पडलं महागात, गावकऱ्यांनी दिली भयंकर शिक्षा ) यावर्षी मे महिन्यात अशीच एक घटना शेजारील पंचमहाल जिल्ह्यात घडल्याचे उघडकीस आले होते. प्रेमसंबंधाच्या संशयावरुन घोघंबा तालुक्यातील खिलोडी गावातील एका जोडप्याला झाडाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.