लखनौ, 08 फेब्रुवारी : लखनौच्या एसआर ग्लोबल कॉलेजची विद्यार्थिनी प्रिया राठोड हिच्या मृत्यूचं प्रकरण सध्या गाजत आहे. जालौन येथील रहिवासी असलेली 13 वर्षीय प्रिया एस. आर. ग्लोबल कॉलेजमध्ये इयत्ता आठवीत शिक्षण घेत होती. 20 जानेवारी 2023 रोजी हॉस्टेलच्या बिल्डिंगवरुन पडून तिचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणी तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. त्यातच आता याप्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिलंय.
प्रिया हिच्या मृत्यूचं प्रकरण दिवसेंदिवस गुंतागुतींचं होत आहे. या प्रकरणात दर दिवशी एकामागोमाग एक धक्कादायक खुलासे होत आहेत. आता या डेथ मिस्ट्रीची नवी बाजू समोर आली आहे. प्रियानं लिहिलेल्या एका पत्रावरुन नवी माहिती समोर आली आहे. पोलिसांना जे पत्र सापडलं आहे, ते प्रियानं तिच्या मृत्यूपूर्वी काही दिवसांपूर्वीच लिहिलं होतं. हे पत्र एका क्रिकेटपटूला लिहिलं गेलं आहे. त्यामुळे पोलीस संबंधित क्रिकेटपटूचा जबाब नोंदवणार आहेत.
हे ही वाचा : भरदिवसा कुऱ्हाडीचा वार, बायकोला संपवून नवरा थेट पोलीस ठाण्यात पोहोचला, बीड हादरलं!
कोण आहे क्रिकेटपटू?
पोलिसांना जे पत्र सापडलं आहे ते प्रियानं 5 डिसेंबर 2023 रोजी लिहिलं होतं. यात तिनं ज्या क्रिकेटपटूचा उल्लेख केलाय, तो खलिलाबाद येथील रहिवासी आहे. पण प्रियानं त्याचं नाव पत्रात लिहिलेलं नाही. पण तिनं पत्रात केलेल्या उल्लेखानुसार संबंधित क्रिकेटपटू मॅच खेळण्यासाठी काश्मीरला गेला होता, हे समोर आलंय.
‘तुझी कॉपी माझ्याकडे आहे. ती मी दिव्यांशीकडे पाठवून देईन. काश्मीरवरुन मला नक्की काहीतरी घेऊन ये. घरी पोहोचलास की स्नॅपचॅटवर रिक्वेस्ट पाठवेन. रिप्लाय नक्की कर, आणि जर नाही केलास तर खूप मार खाशील. तुझी लंगोटिया यार, जिगरी दोस्त, दुश्मन प्रिया राठोड,’ असं प्रियानं या पत्रात लिहिलं आहे.
हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असल्याचा पत्रात उल्लेख
क्रिकेटपटूला लिहिलेल्या पत्रात प्रियानं ती आजारी असून हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असल्याचं म्हटलं आहे. पण तिच्या वडिलांच्या सांगण्यानुसार 5 डिसेंबर 2023 रोजी प्रियाची तब्येत ठीक नव्हती, आणि तिला घरी परत नेण्यासाठी ते लखौनाला आले होते. तिथून तिला जालौन येथे आपल्या राहत्या घरी घेऊन गेले होते. घरी आल्यानंतर वडिलांनी तिला डॉक्टरकडे नेलं असता काही औषधं देऊन डॉक्टरांनी तिला घरी पाठवलं होतं. मग असं असताना प्रिया तिच्या मित्राला ती हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असल्याचं का म्हणत होती? असा प्रश्न उपस्थित झालाय.
पोलिसांवर केला गंभीर आरोप
या प्रकरणी प्रियाच्या वडिलांनी तर आता पोलिसांवरच आरोप केलाय. मुलीच्या हत्या प्रकरणाला आत्महत्येत बदलण्यासाठी पोलीसच आता अशी पत्र स्वत: लिहून मीडियापर्यंत पोहोचवत आहेत, असा आरोप त्यांनी केलाय. दुसरीकडे, प्रियानं ज्या क्रिकेटपटूचा उल्लेख चिठ्ठीत केला आहे, त्याची चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी केली जात असल्याचंही पोलीस म्हणाले. सर्व बाजूंनी तपास करण्यात येतोय. पुरावे गोळा केले जात असून, त्याची तपासणी सुरू असल्याचं नॉर्थ झोनचे डीसीपी कासीम अब्दी यांनी सांगितलं.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना या आधी प्रियाची एक वही मिळाली होती. ज्यात तिनं आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी नमूद करुन ठेवल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना याच वहीमधून एक पान असं सापडलं आहे की, ज्यातील उल्लेखानं याप्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.
हे ही वाचा : आलिशान हॉटेलचे फोटो दाखवले, महाराष्ट्रातील 2 भामट्यांनी गुजरातमधील 20 जणांना लाखोंना लुटले
या उल्लेखामुळे संबंधित प्रकरण आत्महत्या नसून, हत्या असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आता वहीमधील ते पान आणि त्यातील मजकूर कितपत खरा आहे? याची तपासणी पोलिसांनी सुरू केलीय. त्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेतली जातेय. संबंधित पानावर नेमकं प्रियानं काय लिहिलं आहे? याचा खुलासा पोलिसांनी अद्याप केलेला नाही.
दुसरीकडे, लखनौ परिसरात सध्या या प्रकरणाची जोरदार चर्चा आहे. येथील एस. आर. ग्लोबल कॉलेज या प्रकरणामुळे चर्चेत आले असून, परिसरातील नागरिकांतही प्रियाची हत्या केली की तिनं आत्महत्या केली, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder Mystery