मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

'सैराट'मधला प्रिन्स खऱ्या आयुष्यातही निघाला 'खलनायकच', लवकरच अटक होणार

'सैराट'मधला प्रिन्स खऱ्या आयुष्यातही निघाला 'खलनायकच', लवकरच अटक होणार

अटक केलेल्या आरोपींचा फोटो

अटक केलेल्या आरोपींचा फोटो

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

अहमदनगर, 15 सप्टेंबर : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी मंत्रालयात नोकरीला लावण्यासाठी पाच लाखांची मागणी केली होती. अखेर आरोपींच्या कुकृत्याचा उलगडा झाला आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात 'सैराट' या जगप्रसिद्ध चित्रपटात प्रिन्सची भूमिका साकारलेला अभिनेता सुरज पवार याचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटकेतील आरोपींनीच सुरज पवार याच्याबद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे सुरज पवारलाही अटक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नेवासा तालुक्यातील महेश वाघडकर यांनी याप्रकरणी तक्रार केली होती. वाघडकर यांच्या फिर्यादीवरून फसवणूक करणे, बनावट शिक्के आणि दस्तऐवज तयार करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी दत्तात्रय क्षिरसागर (राहणार नाशिक), आकाश शिंदे आणि ओमकार तरटे (दोघेही राहणार संगमनेर ) या तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपींवर भादवि कलम 420, 465, 467, 468, 471 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

मंत्रालयात नोकरी मिळवून देतो असे सांगून सुशिक्षित बेरोजगार तरुणाला फसवणाऱ्या भामट्याला राहुरी पोलिसांनी गजाआड केलंय. यामध्ये मोठे रॅकेट असल्याची माहिती समोर येत आहे. एका गाजलेल्या चित्रपटातील कलाकाराचा सहभाग असल्याने राहुरीचे पोलीस लवकरच प्रसिद्ध चित्रपट सैराटमधील प्रिन्स (सूरज पवार)च्या मुसक्या आवळणार असल्याची माहिती वरिष्ठ पोनि प्रताप दराडे यांनी दिली आहे.

(एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांची गंमत वाटते, असं का म्हणाले शरद पवार?)

महेश बाळकृष्ण वाघडकर (रा.भेंडा, ता. नेवासा,जि.अ.नगर) याला ३ सप्टेंबर रोजी एक फोन आला. समोरची व्यक्ती म्हणाला की, मी श्रीरंग कुलकर्णी सामाजिक न्याय विभाग मंत्रालयातून बोलत आहे. आमच्या विभागात कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या सहायक कक्षाधिकारी म्हणून जागा खाली असून त्या भरायच्या आहेत. तेथे तुम्ही इच्छुक असाल तर तुम्हाला पाच लाख रुपये द्यावे लागतील. काम होण्यापूर्वी दोन लाख आणि जेव्हा तुमच्या हातात ऑर्डर तयार होईल. तेव्हा तीन लाख रुपये द्या. त्यामुळे, रोजगाराचा प्रश्न असल्याने वाघडकर यांनी पैसे देण्यास सहमती दर्शविली. तर, ठरल्याप्रमाणे ४ सप्टेंबर २०२२ रोजी राहुरी बस स्थानकावर दोघांमध्ये तोंडी करार झाला आणि पहिल्या टप्प्यात त्याने आरोपीस दोन लाख रुपये दिले. तर उरलेली रक्कम ३ लाख रुपये ही नियुक्तीपत्र आल्यानंतर देण्याचे ठरले होते.

दरम्यान दोन दिवसानंतर तुमचे नियुक्तीपत्र हे राहुरी विद्यापीठ येथे घेऊन येऊ असे सांगितले. त्यानंतर ९ सप्टेंबर  रोजी आरोपी तथा तोतया श्रीरंग कुलकर्णी याने विद्यापीठ येथे येणार असल्याचे सांगितल्याने फिर्यादी वाघडकर हे देखील तेथे गेले. त्यांनी सोबत तीन लाख रुपये देखील नेले होते. जेव्हा तोतया श्रीरंग कुलकर्णी हा तेथे आला तेव्हा तो राहुरी विद्यापीठाच्या व्हीआयपी गेस्ट हाऊस येथे थांबला होता. त्याच्याकडे काही बनावट कार्ड असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र जेव्हा आरोपी आणि फिर्यादी हे तेथे भेटले तेव्हा आरोपीच्या काही गोष्टींचा वाघडकर यांना संशय आला. तोतया श्रीरंग कुलकर्णी याने आपली फसवणुक केली आहे असे लक्षात आल्याने रक्कम देण्याचे टाळले व आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली.राहुरी पोलिसांनी चौकशी केली असता लक्षात आले की, श्रीरंग कुलकर्णी हा कोणी व्यक्ती मंत्रालयात नसून तो व्यक्ती म्हणजे दत्तात्रय आरुण क्षिरसागर (रा. दत्तनगर, मालेगाव बस स्टॅप नाशिक) हा आहे. पोलिसांनी त्यास बेड्या ठोकल्या आहेत.

ही सर्व घटना लक्षात आल्यानंतर संबंधित ऑर्डर बनविणे, बनावट ओळखपत्र बनविणे यासाठी शिक्के आणि अन्य कागदपत्रे आवश्यक असतात. ते कोठे तयार केले? याबाबत आरोपी याने खुलासा केला. त्यानंतर त्यात आकाश विष्णु शिंदे (रा. संगमनेर) याचे नाव पुढे आले. म्हणून पोलिसांनी पुढे तपास सुरू केला. त्यात ओमकार नंदकुमार तरटे (रा. उपासनी गल्ली, ता. संगमनेर) या तरुणाच्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकला. तो रबरी शिक्के तयार करण्याचे काम करतो. पोलिसांनी तीन जणांना  अटक केली आहे, त्यानंतर त्याच्याकडून मोठी माहिती उघड झाली आहे.

प्रिन्सने नेमकं काय केलं?

सैराट चित्रपटात ज्याने आर्चीचा भाऊ म्हणजे प्रिन्स म्हणून काम केले, तो प्रिन्स देखील संगमनेरात आला होता. त्याने बनावट शिक्के तयार करणाऱ्याला भेटून आम्हाला कामासाठी हे शिक्के लागतात असे सांगून नागराज मंजुळे यांच्याशी बोलणे करून दिल्याचे आरोपीनी सांगितले आहे. आरोपींनी भारताच्या राजमुद्रा बनावट करुन त्याचा गौरवापर केला आहे. म्हणजे हा एक प्रकारे देशद्रोहासारखा गुन्हा मानला जातो. त्यामुळे राहुरी पोलीस लवकरच सैराटचा  प्रिन्स सेलिब्रेटी सुरज पवार याच्या मुसक्या आवळून गजाआड करणार आहेत. पुढील तपास पोनि प्रताप दराडे,उपनिरीक्षक सज्जन नऱ्हेडा, शिपाइ गणेश,लिंपणे,शशी वाघमारे करीत आहेत.

नोकरीचे आमिष दाखवून कुणाची फसवणूक झाली असेल तर अशा तरुणांनी न घाबरता राहुरी पोलिसांशी संपर्क करावा.भविष्यात आपल्याला नोकरीत अडचण येईल हा समज पूर्णपणे खोटा  असल्याने फसवणूक झालेल्यांनी संपर्क करण्याचे आवाहन वरिष्ठ पोनि प्रताप दाराडे यांनी केले आहे.

First published:

Tags: Crime, Police arrest, Sairat