पुणे, 15 सप्टेंबर : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प तळेगावला येणार होता. राज्य सरकारने तयारी केली होती, पण आता काही उपयोग नाही. आता चर्चा करण्यात अर्थ नाही, प्रकल्प जाणे हे दुर्दैव आहे’ अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली. तसंच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उदय सामंत हे आधीच्या सरकारमध्ये मंत्री होते, त्यांच्या विधानांची गमंत वाटते, असा टोलाही पवारांनी लगावला. वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे राजकीय वाद पेटला आहे. याच मुद्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. ‘हा प्रकल्प तळेगावला येणार होता, राज्य सरकारने तयारी केली होती, पण आता काही उपयोग नाही. आता चर्चा करण्यात अर्थ नाही. उद्योगमंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकलं ते म्हणाले, गेल्या वेळच्या सरकारची ही जबाबदारी आहे, गंमत आहे हे तिथे पण मंत्री होते. मागील सरकारमध्ये उदय सामंत हे मंत्री होते. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून ते आणि एकनाथ शिंदे हे मंत्री होते. त्यामुळे दोघेही मंत्रिमंडळामध्ये होते. त्यामुळे तेच आता बोलत आहे’ असा टोलाही पवारांनी उदय सामंत यांना लगावला. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी मदत करत असतील तर आनंद आहे. हा प्रकल्प गेला तर जाऊ द्या, आणखी एक मोठा प्रकल्प राज्याला मिळणार आहे असं सांगण म्हणजे, एखाद्या घरामध्ये एखाद्या लहान मुलाला फुगा दिला अन् दुसऱ्या मुलाला दिला नाही आणि त्याच्यापेक्षा तुला मोठा फुगा देऊ असं सांगणे, याच प्रकारे पंतप्रधान मोदींनी शिंदेंनी समजूत काढली, असा टोलाही पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंना लगावला. (फॉक्सकॉन प्रकल्पावरून प्रकाश आंबेडकरांचा अजित पवारांवर गंभीर आरोप, म्हणाले…) केंद्राची सत्ता हातात असल्यावर हे अनुकुल होत असतं. गुजरातला जर प्रकल्प मिळाला असेल तर तक्रार करायची गरज नाही. नरेंद्र मोदी तिथे आहे, अमित शहा हे तिथे आहे. त्यांच्या हातात देशाचे सूत्र आहे. थोडे लक्ष दिले तर आम्ही समजू शकतो. आता ते दोघे गुजरातचे आहेत, घराकडे ओढ असणे साहजिक आहे, असा टोलाही पवारांनी लगावला. चाकण हे ॲाटोमोबाईल हब आहे. वेदांताचा प्रकल्प येणार असला तर शेवटपर्यंत येईल की नाही याबाबत मला शंका आहे. आता जे गेल ते गेलं, नवीन काय आणता येईल ते बघायला हवं, असंही पवार म्हणाले. (महाराष्ट्राचा प्रकल्प गुजरातला का गेला? वेदांताच्या अध्यक्षांनी सांगितली Inside Story) संपूर्ण यंत्रणा थंड झाली आहे. भरपूर जेवण झाल्यावर माणूस थंड होतो तसं महाराष्ट्राचं झालंय. त्यामुळे नेतृत्वाने प्रयत्न करायची गरज आहे. आज टीव्ही लावली की काय दिसतं, कुठे ही झाड काय, ती काय हवा काय, ते अंतिम काय, एखाद्यादिवशी ठीक आहे. पण रोजच काय आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे. त्यांनी आता राज्याचा विचार केला पाहिजे. एकमेकांचे वाद सारखे काढले जात आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन संवादाची वाट काढली पाहिजे. सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये चांगले वातावरण कसे निर्माण होईल, याचा प्रयत्न करावा, असा सल्लाही पवारांनी दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.