जोधपूर, 13 ऑगस्ट : पाण्यात बुडणाऱ्या जिजाला (brother in law) वाचवण्याऐवजी त्याचा मेहुणा आणि आणखी एक नातेवाईक (relative) यांनी तिथून पळ (ran away) काढला. दारुच्या नशेत (drunk) पोहण्यासाठी जलाशयात उतरल्यानंतर जिजा पाण्यात बुडू लागला, मात्र त्याकडे दुर्लक्ष करत मेहुण्यानं तिथून पळ काढला. हे पाहून त्यांच्यासोबत असणाऱ्या आणखी एका नातेवाईकानंही तिथून धूम ठोकली.
राजस्थानमधील अजमेरमध्ये राहणारे हे तिघे फिरण्यासाठी जोधपूरला आले होते. कायलाना परिसरातील तखतसागर जलाशयाच्या परिसरात ते गप्पा मारत बसले होते. येताना त्यांनी सोबत दारूच्या बाटल्याही आणल्या होत्या. अनेक तास ते दारू पित जलाशयाच्या किनाऱ्यावर बसले होते. दारू पिऊन तिघेही नशेच्या आहारी गेल्यानंतर त्यांना पाण्यात पोहण्याची हुक्की आली.
नशेत जलतरण
जिजा, मेहुणा आणि एक नातेवाईक या तिघांनीही भरपूर दारू प्यायली होती आणि तिघांचंही स्वतःच्या हालचालींवर अजिबात नियंत्रण नव्हतं. तरीही तिघे पोहण्यासाठी जलायशयात उतरले. काही वेळाने या तिघांपैकी जिजा खोल पाण्यात गेला आणि बुडू लागला. त्याला तिथून बाहेर येता येईना. मदतीसाठी तो आरडाओरडा करू लागला आणि दोघांना हाका मारू लागला. ते पाहून दोघेही घाबरले आणि त्याला मदत करण्याऐवजी पाण्याच्या बाहेर आले. बाहेरून त्याचा आरडाओरडा ऐकून त्यांनी सरळ तिथून धूम ठोकली. जिजा पाण्यात बुडत होता आणि त्याचा मेहुणा आणि नातेवाईक पळून चालले होते.
सुरक्षारक्षकांनी वाचवले
या जलाशयाच्या परिसरात असणाऱ्या सुरक्षारक्षकांनी बुडणाऱ्या इसमाचा आवाज ऐकून तिकडे धाव घेतली आणि त्याला पाण्यातून बाहेर काढलं. त्याचा जीव वाचला असून तब्येत ठणठणीत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
हे वाचा -मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ...तोपर्यंत हटणार नाहीत मुंबईतले कोरोना निर्बंध!
हे तिघेही कामगार असून विरंगुळ्यासाठी ते जोधपूरला आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र आपला नातेवाईक बुडत असताना त्याला मदत करण्याऐवजी दोघे पळून गेल्यामुळे जोरदार चर्चा रंगली आहे. दारूच्या नशेत माणसं आपली माणुसकीदेखील कशी विसरतात, हेच यातून दिसून आल्याची चर्चा रंगते आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.