लखनऊ 02 डिसेंबर : प्रेम आंधळं असतं, असं तुम्ही ऐकलं असेल. घरच्यांनी नकार दिल्यानं आत्महत्या करणारी प्रेमीयुगुलं, एकतर्फी प्रेमातून प्रेयसीवर केला जाणारा हल्ला, अशा अनेक घटना घडण्याचं प्रमाणही वाढत आहे. उत्तर प्रदेशातील आझमगड रेल्वे स्थानकावर असाच एक धक्कादायक प्रकार घडलाय. रेल्वे स्थानकावरच एका युवकानं त्याच्या प्रेयसीच्या गळ्यावर धारदार शस्त्रानं वार केला. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला. ही तरुणी जहाँगज (जि. आझमगड) येथील तर तिच्यावर हल्ला करणारा तरुण हा बिलरियागंज पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी आहे.
आझमगड रेल्वे स्थानकावर मुंबईहून येणाऱ्या रेल्वेमधून खाली उतरलेल्या प्रेमीयुगुलामध्ये वाद झाला. या वादातूनच प्रियकरानं त्याच्या प्रेयसीच्या गळ्यावर धारदार शस्त्रानं वार केला, आणि नंतर त्याच शस्त्रानं स्वतःचा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना पाहून रेल्वे स्थानकावरील प्रवाशांमध्ये घबराट पसरली. याबाबत, 108 रुग्णवाहिका आणि स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर या दोघांनाही जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं.
पत्नी, मुले असतानाही त्या महिलेशी संबंध का ठेवतोस, विचारल्यावर मोठ्या भावासोबतच भयानक कांड
या प्रकरणाची माहिती देताना आझमगड शहर पोलीस अधीक्षक शैलेंद्र लाल यांनी सांगितलं की, ‘प्रेम प्रकरणातून ही घटना घडली आहे. धनंजय पासवान ( वय 22) याचे 18 वर्षांच्या तरुणीवर एकतर्फी प्रेम होतं. तरुणीचा पाठलाग करत धनंजय हा मुंबईला गेला होता. तरुणीनं धनंजयला लग्नासाठी नकार दिला. या नंतर तरुणी मुंबईहून तिच्या घरी येत असताना आझमगड रेल्वे स्थानकावर धनंजयने धारदार शस्त्रानं तिच्या गळ्यावर वार केला. यात तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.’
प्रवाशांची आरडाओरड
रेल्वे स्थानकावर प्रियकरानं तरुणीच्या गळ्यावर धारदार शस्त्रानं वार केल्यानंतर स्वत:चा गळा सुद्धा धारदार शस्त्रानं चिरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या वेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या दोघांना पाहून रेल्वे स्थानकावरील प्रवासी घाबरले, व त्यांनी आरडाओरड केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, या घटनेत तरुणीचा मृत्यू झाला, तर तरुण गंभीर जखमी असलेल्या तरुणावर प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी हायर सेंटरमध्ये नेण्याचा सल्ला दिला.
दरम्यान, या घटनेनंतर संपूर्ण आझमगड परिसर हादरला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.