पुणे, 07 जानेवारी: गुन्हेगार कितीही हुशार असला, तरी तो पोलिसांपासून वाचणं तसं अवघडच! त्यामुळे अनेकदा एखादा मोठा गुन्हा लपवण्यात यशस्वी झालेल्या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अनेक वर्षांनी यश आल्याचं तुम्ही ऐकलं असेल. आज आम्ही तुम्हाला अशीच एका खुनाची घटना सांगणार आहोत, ज्यामधील आरोपीला तब्बल 10 वर्षानंतर जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं होतं. तब्बल 10 वर्षानंतर या गुन्हेगाराला पकडण्यात पोलिसांना यश आलं होतं. संतोष कातोरे असं या गुन्हेगारांच नाव असून, त्याला पोलिसांनी 2017 मध्ये अटक केली. तर, त्याने त्याची प्रेयसी असणाऱ्या अर्चना सांगळे या महिलेचा 2006 मध्ये खून केला होता.
अर्चना सांगळे कोण होती?
अर्चना सांगळे ही पुणे येथे राहत होती. अर्चनाचा विवाह एका नोकरदार तरुणाशी झाला होता. या नात्यात बांधल्यानंतर अर्चना आणि तिचा पती दोघेही आनंदात होते. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. पुढे पतीसोबत पटत नसल्यामुळे अर्चना वेगळी राहू लागली. त्यानंतर तिची संतोष कातोरेशी ओळख झाली. या दोघांचे प्रेम जुळले. त्यानंतर दोघांनी मिळून पुण्यातील बाणेर भागात फ्लॅट विकत घेतला होता. त्या फ्लॅटवर अर्चना व संतोष 15 डिसेंबर 2005 एकत्र राहू लागले. पण त्यानंतर अर्चना 4 नोव्हेंबर 2006 रोजी अचानक बेपत्ता झाली.
(आणखी एक हादरवणारं कांड! पत्नीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केले अन्..., धक्कादायक कारण समोर)
या प्रकरणी अर्चनाच्या वडिलांनी तक्रार दिली होती. त्यातच पोलिसांना मच्छिंद्रगड येथे अर्चना हिचा मृतदेह सापडला होता. पोस्टमॉर्टममध्ये गळा आवळून तिचा खून केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी अर्चनासोबत राहणारा तिचा प्रियकर संतोष कातोरेला ताब्यात घेतले, व त्याच्याकडे चौकशी केली. पण, त्यामध्ये काहीच निष्पन्न झाले नाही. त्याच्याविरुद्ध असा कोणताही पुरावा किंवा सुगावा पोलिसांना मिळू शकला नाही. त्यामुळे अखेर संतोषला सोडून देण्यात आले होते.
संतोषने फ्लॅट विकला अन्...
दरम्यान, अर्चना सांगळे व संतोष कातोरे हे बाणेर येथे ज्या फ्लॅटवर राहत होते, तो फ्लॅट अर्चना व संतोष या दोघांच्या नावावर होता. संतोषने 6 फेब्रुवारी 2012 मध्ये हा फ्लॅट अर्चना सांगळे म्हणून एक डमी महिला उभी करून स्वतःच्या नावावर करून घेतला. त्यानंतर या फ्लॅटची विक्री करण्यात आली. परंतु येथेच तो फसला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास करीत असतानाच अर्चना सांगळे हिच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आला.
म्हणून केला खून
पोलिसांच्या तपासात फ्लॅटच्या वादातूनच संतोषने अर्चना हिचा खून केल्याचं समोर आलं. संतोषनं बनावट कागदपत्रांवर फ्लॅट त्याच्या नावावर कसा केला, याचा तपास पोलीस करत होते. याप्रकरणी पोलिसांनी संतोष कातोरे याला चौकशीसाठी बोलावले. त्याची चौकशी करण्यात आली. तेव्हाच पोलिसांना संतोष कातोरे यानेच अर्चना सांगळे हिचा खून केल्याचा संशय आला होता. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा एकदा अर्चनाच्या हत्येची फाईल उघडली, व त्याप्रकरणी संतोष कातोरे यांची पुन्हा चौकशी केली. सुरुवातीला तो पोलिसांना उडवाउडवीचे उत्तर देत होता. मात्र पोलिसांनी हिसका दाखवताच त्यानं सत्य सांगितलं. ज्यादिवशी संतोषने पोलिसांसमोर अर्चनाच्या खुनाचे रहस्य उलघडले, तो दिवस 17 जानेवारी 2017 चा होता.
(नात्याला काळिमा! आईने तोंड दाबलं आणि बापानं स्वतःच्याच 7 वर्षीय मुलीवर केले लैंगिक अत्याचार)
संतोषने पोलिसांना सांगितलं की, ‘मी आणि अर्चनाने 2005 मध्ये तो फ्लॅट घेतला होता. यात अर्चनानं मोठी रक्कम दिली होती. मात्र नंतर मला नफ्यासाठी तो फ्लॅट विकायचा होता. पण अर्चना तसे करण्यास नकार देत होती. यावरून आमच्यात सातत्यानं भांडण होत होतं.’
असा केला खून
4 नोव्हेंबर 2006 रोजी देवदर्शनासाठी जाण्याचा बहाणा करून संतोषने अर्चना हिला कोल्हापूर येथे नेलं होतं. कोल्हापूर येथून येताना संतोषनं अर्चना हिचा एका निर्जनस्थळी गळा आवळून खून केला. त्यानंतर संतोषनं अर्चनाचा मृतदेह मच्छिंद्रगड किल्ल्यात टाकून दिला होता. दरम्यान, अर्चना सांगळे या महिलेच्या खुनाचा तब्बल 10 वर्षानंतर पोलिसांनी शोध लावल्यामुळे पोलिसांच्या या कामगिरीचं खूप कौतुक झालं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.