पवन सिंह कुंवर, प्रतिनिधी हल्द्वानी, 12 जून : उत्तराखंडच्या हल्द्वानी भागात राहणारी एक तरुणी आज नवरी होऊन नटूनथटून वाजतगाजत नवऱ्याच्या घरी गेली असती. फुलांच्या माळांनी तिचंही अंगण सुंदररीत्या सजलं असतं. सासरचा उंबरठा ओलांडून तिने नवं आयुष्य जगलं असतं. परंतु एका व्हॉट्सऍप मेसेजने तिची आयुष्यभराची झोप उडवली. आज 12 जून रोजी होणारं तिचं लग्नही मोडलं आणि प्रकरण थेट पोलीस स्थानकात पोहोचलं. या तरुणीला लग्नाच्या काही दिवसांपूर्वीच तिच्या नवऱ्याने तिचेच अश्लील फोटो व्हॉट्सऍपवर पाठवले होते. ते पाहून तिला मोठा धक्काच बसला. ती भीतीने थरथर कापू लागली. कारण हे फोटो त्याने नाही, तर तिच्या एक्स बॉयफ्रेंडने काढले होते. आता ते होणाऱ्या नवऱ्याकडे आल्याचे पाहून ती एक्स बॉयफ्रेंडवर चांगलीच खवळली. तिने याबाबत जाब विचारण्यासाठी त्याच्याशी संपर्क साधला. परंतु त्याने तिची माफी मागायची सोडून उलट तिलाच शिवीगाळ केली आणि वरून तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही दिली. त्यानंतर तिचं लग्न मोडलं आणि तिने याविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.
तरुणीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ती 2019 मध्ये रुद्रपूर येथील एका कंपनीत काम करायची. कोटद्वारचा रहिवासी अखिलेश देवराणी हादेखील याच कंपनीत कामाला होता. त्यादरम्यान दोघांची चांगली मैत्री झाली होती. हळूहळू हे नातं प्रेमात बदललं. मी तुझ्याशी लग्न करेन, असं आमिष दाखवून अखिलेशने तिचे अश्लिल फोटो आणि व्हिडिओ बनवल्याचा आरोप तरुणीने केला आहे. काही काळ हे असंच सुरू राहिलं. अखेर तरुणीने समोरून अखिलेशला लग्नाबाबत विचारलं परंतु तेव्हा मात्र त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. या धक्क्यातून ती कशीबशी सावरली आणि अखिलेशशिवाय आपलं आयुष्य जगू लागली. तिच्या कटुंबियांनी राणीशेत भागातील एका तरुणाशी तिचं लग्न ठरवलं. या लग्नासाठी ती स्वखुशीने तयार झाली होती. Kerala dog attack : केरळमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस; कन्नूरमध्ये 11 वर्षीय बालकाचे तोडले लचके याचवर्षी 16 एप्रिलला तिचा साखरपुडा झाला. तरुणीसाठी अखिलेशचा विषय संपला होता परंतु तो अद्यापही तिच्या आयुष्यात डोकावत होता. तिच्या साखरपुड्याची बातमी कळताच तो प्रचंड संतापला. रागाच्याभरात त्याने फेसबुकवर फेक आयडी तयार करून तिच्या होणाऱ्या नवऱ्याला तिचे खासगी फोटो आणि व्हिडिओ पाठवले. त्यानंतर अगदी काही दिवसांवर असलेलं तरुणीचं लग्न मोडलं. लग्न मोडल्यामुळे आपल्या कुटुंबाची प्रचंड बदनामी झाली असल्याचं पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे. अखिलेशवर कठोर कारवाईची मागणी तिने केली आहे. दरम्यान, तिच्या तक्रारीनुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं.