जयपूर, 6 ऑक्टोबर : तोंडावर मास्क लावून आलेल्या दरोडेखोरांनी बँकेवर (Bank looted within one minute) दरोडा घालून केवळ एका मिनिटात लाखो रुपये लुटून नेल्याची घटना समोर आली आहे. दुपारच्या सुमाराला स्टेट बँक ऑफ इंडियात (three criminals looted SBI) घुसलेल्या तीन दरोडेखोरांनी वेगाने हालचाली करत दरोडा घातला. कुणालाही कळण्यापूर्वी आणि कुणी काही हालचाल करण्यापूर्वी हाताशी लागलेली कॅश घेऊन त्यांनी पोबारा केला.
असा पडला दरोडा
राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात खंडप नावाच्या गावात स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमाराला तीन दरोडेखोर या बँकेत घुसले. एकामागून एक त्यांनी बँकेत प्रवेश केला. तिघेही बँकेत दाखल झाल्यानंतर त्यांनी पिस्तुल दाखवत सर्वांना शांत राहण्याची तंबी दिली. त्यानंतर थेट कॅशिअरकडे धाव घेत त्याच्याकडे असलेले सुमारे 6 लाख रुपये लुटून त्यांनी बँकेतून काढता पाय घेतला.
पोलीस करतायत चौकशी
घटनेची कल्पना मिळाल्यानंतर तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र पोलीस येईपर्यंत दरोडेखोरांनी तिथून पळ काढला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. दरोडेखोर बँकेतून निघाल्याक्षणी कर्मचाऱ्यांनी पोलिसांना फोन करून याची कल्पना दिली होती. पोलीसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपींचा शोध त्यांनी सुरु केला.
हे वाचा -क्रूझ ड्रग्ज पार्टीच्या कारवाईत नवा ट्विस्ट, नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोट
बँकेत नव्हती गर्दी
दुपारची वेळ असल्यामुळे बँकेत गर्दी नव्हती. त्यामुळे नेमकी हीच वेळ साधत दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश केल्याचं एका कर्मचाऱ्यानं सांगितलं. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वांना हात वर करायला लावले आणि शांत राहायला सांगितलं. तिथं उपस्थित सर्व कर्मचारी आणि ग्राहकांवर दोन दरोडेखोर लक्ष ठेऊन होते, तर तिसऱ्यानं कॅश काऊंटरवरून पैसे ताब्यात घेतले. पैसे घेतलेला दरोडेखोर अगोदर बाहेर पडला आणि त्यानंतर इतर दोघे तिथून निघाले. एका मिनिटाच्या आत हा सर्व प्रकार घडला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.