राहुल खंदारे, बुलढाणा, 26 ऑगस्ट : चिखली तालुक्यात एका जिल्हा परिषद शाळेच्या स्त्री लंपट शिक्षकाने विद्यार्थी आणि पालकांना हादरवून सोडणारे कृत्य केलं आहे. या वासनांध शिक्षकाने आपल्याच तीन चिमुकल्या विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिक्षण विभागाने त्या स्त्री लंपट शिक्षकाला तडकाफडकी निलंबित केलं आहे. तर शाळेच्या मुख्याध्यापकाला सुद्धा नोटीस बजावली आहे. मात्र अद्यापही या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली नाहीय. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत संबंधित प्रकार घडला आहे. या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत वर्ग आहेत. तर शाळेतील पटसंख्या ही 22 आहे. मात्र या शाळेतील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त एका शिक्षकाने तीन विद्यार्थिंनीसोबत लैंगिक चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सुरुवातील पीडित मुली आणि पालकांनी हा प्रकार शाळा समिती, तसेच मुख्याध्यापकाला सांगितला होता. मात्र त्यावर मुख्याध्यापकाकडून काहीच कारवाई झाली नाही. उलट मुख्याध्यापक आणि स्थानिक शाळा समितीने हा प्रकार जिथल्या तिथेच दाबला. असा काही प्रकार घडलाच नाही म्हणून शाळा प्रशासनाने प्रकरण दाबले. ( रिसेप्शनिस्टचा जीव जडला मित्रावर, लग्नाला परिवाराने होकार दिल्यावर त्याचं धक्कादायक कृत्य ) दुसरीकडे शिक्षण विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी केली आणि नराधम शिक्षक जगदीश पठाडे याला तडकाफडकी निलंबित केलं. तर मुख्याध्यापकाने हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. संबंधित प्रकरण पोलिसांत दाखल झाले नसले तरी शिक्षकाकडून चिमुकल्या विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करण्याची घटना संतापजनक आहे. गावातूनही घटनेची तक्रार करण्यासाठी कोणी पुढाकार घेतला नाही. दबावाखाली असलेले पीडितेचे आई, वडील आपल्या मुलींवरचा अन्याय सोसत आहेत. मात्र हे संपूर्ण प्रकरण दडपणाऱ्या लोकांवर तात्काळ पोलीस कारवाई होणे अपेक्षित आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.