ठाणे, 19 एप्रिल : ‘आई म्हणे माले पोऱ्या झाया, भाऊ म्हणे माले दुश्मन झाला’, अशी अहिराणी भाषेतील एक मार्मिक म्हण आहे. या म्हणीचा अर्थ खूप खोलवर दडला आहे. मराठीत आपण ‘सख्खा भाऊ, पक्का वैरी’ अशीही एक म्हण ऐकली असेल. अगदी अशाच म्हणींना समर्पक ठरणारी खूप वाईट घटना ठाण्याच्या कळवा येथे घडली आहे. सुरुवातीला आरोपी भावाकडून मृतक तरुण हा बेपत्ता असल्याचा बनाव तयार केला गेला होता. पण नंतर जेव्हा पोलिसांनी सत्य उलगडून काढलं तेव्हा कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण मृतकाच्या सख्ख्या भावानेच आपल्या भावाची हत्या करण्यासाठी 50 हजार रुपयांची सुपारी दिली होती. संबंधित घटना उघड झाल्यानंतर कळव्यात खळबळ उडाली आहे. संबंधित घटनेतील मृतक तरुणाचं मंगेश पाटील असं नाव आहे. तो 26 वर्षांचा होता. तर त्याचा सख्ख्या भावाचं उद्देश पाटील असं नाव आहे. उद्देशने कळव्यात असलेल्या प्रवीण जगताप नावाच्या एका तरुणाला आपल्या सख्ख्या भावाला जीवे मारण्याची सुपारी दिली होती. उद्देशने इतका टोकाचं पाऊल का उचललं ते अद्याप समजू शकलेलं नाही. पण उद्देशने आपल्या भावाला मारण्याती सुपारी दिल्याची माहिती समोर आल्यानंतर परिसरातील सर्व नागरिकांना धक्का बसला आहे. याशिवाय त्यांच्या कुटुंबातही अस्वस्थता पसरली आहे. ( Platinum धातूच्या तुकड्यांची भूक, आळंदीच्या दोन चोरट्यांकडून डझनभर Eeco गाडीच्या सायलेन्सरची चोरी ) उद्देशने आपला भाऊ मंगेशची सुपारी दिल्यानंतर प्रवीण कुकृत्याच्या कामाला लागला. प्रवीणने मंगेशला गोड बोलून मुरबाडला नेलं. त्यानंतर तिथे त्याचा गळा चिरुन त्याची निर्घृणपणे हत्या केली. प्रवीण एवढ्यावरच थांबलं नाही. त्याने कुणाला हत्येचा सुगावा लागू नये म्हणून मंगेशचा मृतदेह जमीनीखाली गाडला. पण गुन्हेगार गुन्हा करत असताना काहीतरी पुरावा मागे सोडतोच, असं बोलतात. अगदी तसंच काहीसं झालं. कारण कळव्यात मंगेशच्या कुटुंबियांनी तो मिसिंग असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत होते. पोलिसांनी मंगेशचा शोध घेत असताना त्याच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासले. यावेळी मंगेश ज्यादिवसापासून बेपत्ता आहे त्यादिवशी त्याने एका अनोळखी मोबाईल नंबरवरुन बातचित केली होती. पोलिसांनी त्या अनोळखी मोबाईल नंबरची माहिती मिळवली. संबंधित सीमकार्ड हे आरोपी प्रवीण याच्याच नावावर होतं. पोलिसांनी त्या सीमकार्डच्या माहितीच्या आधारावर प्रवीणला हेरलं. त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी प्रवीणने आपला गुन्हा कबूल केला. तसेच मंगेशच्या भावानेच आपल्याला त्याच्या हत्येची सुपारी दिली होती, अशी कबुली दिली. दरम्यान, या घटनेप्रकरणी सध्या पोलिसांचा तपास सुरु आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.