जमताडा : बऱ्याच ठिकाणी आजही लग्नानंतर स्त्रियांना आपल्या मर्जीचे कपडे घालता येत नाहीत. त्यांना हवं तसं राहता येत नाही. आजही अनेक भागांमध्ये घराच्या रिती परंपरा जपून स्त्रियांना वावरावं लागतं. मात्र एका स्त्रिने याचा विरोध केला. नुसता विरोध नाही तर स्वत:च्या हाताने 7 जन्माचं नातं संपवलं आणि आपलं कुंकूही पुसलं.
तुझं लग्न झालंय आता तू जीन्स घालू नको असं पतीने टोकलं. त्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. जीन्स घालू न देण्यावरून पत्नीचा पारा चढला आणि तिने टोकाचं पाऊल उचललं. तिने आपलं कुंकू पुसलं आणि पतीलाही रागाच्या भरात संपवलं. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
ही धक्कादायक घटना झारखंड जिल्ह्यातील जमताडा परिसरात घडली आहे. तिथे गावात पुष्पा हेंब्रम नुकतीच लग्न करून आली होती. लग्नाला दोन महिने पूर्ण झाले होते. पतीने जिन्स घालण्यावरून टोकलं. यावरून वादावदी झाली.
संतापलेल्या पत्नीने टोकणाऱ्या पतीवर धारदार शस्त्राने वार केले. जखमी अवस्थेत या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृतक तरुणाच्या वडिलांनी पोलिसांना याची माहिती दिली आहे.
पत्नीला जीन्सवरून टोकल्याने पतीला याचे परिणाम भोगावे लागले. आरोपी पत्नीने आपला गुन्हा कबूल केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Jharkhand