आग्रा, 14 मार्च: बहिण भावाचं नातं हे पवित्र नातं मानलं जातं. या नात्यात अनेकदा छोटी मोठी भांडणं होतं असतात. पण हे नातं अतूट मानलं जातं. पण पाच वर्षाच्या भावासोबत भांडण झाल्यानंतर 10 वर्षाच्या बहिणीने टोकाचं पाऊल उचललं आहे. 5 वर्षांच्या भावासोबत झालेला वाद जिव्हारी लागल्याने 10 वर्षाच्या बहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केली (10 year old girl suicide) आहे. या आत्महत्येनं परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित मुलगी तिच्या तीन बहिणी आणि एका भावासोबत राहत होती. तिच्या आईचं यापूर्वीचं निधन झालं आहे, तर वडिलांनी त्यांना वाऱ्यावर सोडून ते कुठेतरी निघून गेले आहेत. या सर्वांचा सांभाळ त्यांची मोठी बहिण करीत होती, जी या घटनेच्या वेळी कामावर गेली होती. अशा परिस्थितीत संबंधित मुलीने आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोणत्या तरी किरकोळ कारणावरून पाच वर्षाच्या लहान भावासोबत दहा वर्षाच्या बहिणीचं भांडण झालं होतं. यानंतर राग अनावर झालेल्या बहिणीने घराच्या दाराच्या वरच्या बाजूला असलेल्या अँगलला फास बांधून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणाची माहिती मिळताच सीओ आणि पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी इंस्पेक्टर प्रदीप कुमार यांनी सांगितलं की, मृत मुलीने भावासोबत झालेल्या भांडणात छोट्या भावाला मारहाण केली. त्यानंतर ती घरात गेली आणि ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदर घटना उत्तर प्रदेशातील आग्राजवळील ताजनगरीतील एका गावात घडली आहे. रविवारी सकाळी या मुलीनं गळफास घेवून आपलं जीवन संपवलं असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत, अशी माहितीही पोलीस अधिकारी प्रदीप कुमार यांनी दिली आहे. (हे वाचा - जमीन विकून महिलेवर उडवत होता पैसे, वैतागून मुलानंच काढला बापाचा काटा ) पोलिसांनी पुढे सांगितलं की, संबंधित भावंडांच्या आईचं दीड वर्षांपूर्वी निधन झालं आहे. तसेच वडीलही त्यांना सोडून निघून गेले आहेत. गेल्या बऱ्याच दिवसांपासून ते या अनाथ मुलांकडे आले नाहीत. या भांवंडाची सर्वात मोठी बहिण 18 वर्षांची असून ती आपल्या घरात पाच वर्षाचा भाऊ, 10 वर्षाची आणि दीड वर्षाची लहान बहीणींसोबत राहत होती. आपल्या लहान भावंडाचा सांभाळ करता यावा यासाठी ती एका कपड्याच्या दुकानात काम करत होती. पण अचानक या आत्महत्येच्या घटनेनं तिही मोडून पडली आहे. संबंधित 10 वर्षाच्या मुलीनं आत्महत्या केल्यामुळे प्रतापपुरा गाव हादरलं असून गावातील लोकं सुन्न झाली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.