पुणे, 17 नोव्हेंबर : मिठाईचं दुकान उचकटून चोरी करणाऱ्या झुरळ्याला समर्थ पोलिसांनी थेट गजाआड केलं आहे. नावावरून तुमच्या मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो. मात्र झुरळ्या असं पुण्यातील एका अट्टल चोराचं नाव आहे.
दुकानाचे शटर उचकटून चोरी करणाऱ्या तडीपार गुंडाला समर्थ पोलिसांनी 24 तासात जेरबंद केलं आहे. त्याच्याकडून 46 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. याच तडीपार गुंडाचं नाव आकाश उर्फ झुरळया पाटोळे असं आहे. पाटोळे हा तडीपार असून त्याच्यावर खडक व समर्थ पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचे 15 गुन्हे दाखल आहेत.
झुरळ्या याने 15 तारखेला सकाळी 6 वाजता भवानी पेठेतील मंगलम ड्रायफूट या दुकानांचे शटर उचकटून दुकानातून 48 हजार रुपये रोख रक्कम व मिठाई चोरली होती. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता.
हेही वाचा - CCTV VIDEO : भरदिवसा ज्वेलर्सच्या दुकानात बंदुकीसह घुसले चोर, मात्र तरीही कामगाराने केलं धाडस
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चक्र फिरवली आणि सीसीटीव्हीच्या आधारे झुरळ्याचा शोध घेतला. पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलिसांनी 24 तासात आरोपीला अटक केली आहे. पैसे आणि मिठाई चोरणाऱ्या झुरळंयाला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.