नांदेड, 24 मे: आपल्या मुलांना वाईट व्यसन लागू नये म्हणून आई वडील आयुष्यभर प्रयत्न करत असतात. तर वाईट व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलाची परत त्यापासून सुटका करण्यासाठीही जीवाचं रान केलं जातं. पण कधी कधी आई वडिलांचा हा प्रयत्न त्यांच्याच जीवावर बेतू शकतो. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील पाटोदा याठिकाणी अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. मुलाकडील दारुची बाटली काढून घेत असताना, मुलानं ढकलून दिल्यानं 90 वर्षीय वडिलांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. संबंधित अटक केलेल्या मुलाचं नाव माधव कोल्हेकर आहे. त्याला दारूचं व्यसन आहे. मागील बऱ्याच वर्षापासून तो मद्यप्राशन करतो. त्याच्या दारुच्या व्यसनामुळे बऱ्याचदा घरात भांडणंही झाली आहेत. त्यामुळे आपल्या मुलानं दारू पिऊ नये म्हणून 90 वर्षीय वडील दौलता अमृता कोल्हेकर नेहमी प्रयत्न करत असायचे. पण मुलगा माधव कोल्हेकर याचं दारुचं व्यसन काही सुटत नव्हतं. 13 मे रोजी सकाळी 11 वाजता मुलगा माधव कोल्हेकर दारुची बाटली घेऊन घरात आला. यावेळी वृद्ध वडील दौलता यांनी मुलाला दारू पिण्यापासून रोखलं. तसेच त्याच्या हातातील दारुची बाटली काढून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपी मुलानं वडिलांना ढकलून दिलं. ढकलून दिल्यानंतर वडिलांना तोल सावरता आला नसल्यानं त्यांचं डोकं घरातील गॅस सिलिंडरच्या टाकीवर जाऊन आदळलं. यात ते गंभीर जखमी झाले आणि क्षणात त्यांनी जीव सोडला. हे ही वाचा- मैत्रीत दगा! सोनं खरेदीच्या बहाण्यानं सराफाला बोलावलं; कात्री खूपसून केला घात या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर पोलीसांनी आरोपी मुलाला अटक देखील केली आहे. या घटनेचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.