मुंबई 14 जानेवारी : दररोज अनेक महिला हिंसाचार आणि अत्याचाराच्या बळी ठरतात. अशा घटनांमधले आरोपी कधी-कधी अनोळखी असतात तर कधी-कधी खूप जवळच्या व्यक्तीदेखील असतात. मुंबईमध्ये अशी एक घटना घडली आहे, ज्यामध्ये एका महिलेसोबत 25 वर्षं राहिलेल्या पुरुषानेच तिच्यावर अॅसिड हल्ला केला आहे. मुंबईतल्या गिरगाव परिसरात अॅसिड हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 13 जानेवारी (शुक्रवार) रोजी पहाटे साडेपाच वाजता ही घटना घडल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करून आरोपीला अटक केली आहे.
महिला कथ्थक डान्सर असल्यामुळे घडली 'ती' घटना; Air India लघुशंका प्रकरणातील आरोपीचा अजब दावा
समोर आलेल्या माहितीनुसार, गिरगाव परिसरातल्या फणसवाडीमध्ये पीडित महिला महेश पुजारी (62 वर्षं) नावाच्या व्यक्तीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. गेल्या 25 वर्षांपासून हे दोघं जण एकत्र राहत होते. काही दिवसांपासून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. या कारणावरून पीडित महिला महेशवर घर सोडण्यासाठी दबाव टाकत होती. गेल्या दोन दिवसांपासून महेश घराबाहेर होता. शुक्रवारी सकाळी ही महिला पाणी भरण्यासाठी घराबाहेर पडली तेव्हा महेशनं तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकलं.
महिलेचा आरडाओरडा आणि किंकाळ्या ऐकून आजूबाजूच्या व्यक्तींनी घटनास्थळी धाव घेतली. तिची परिस्थिती बघून तिला रुग्णालयात दाखल केलं आणि पोलिसांना माहिती दिली. सध्या पीडित महिलेची प्रकृती गंभीर आहे. एलटी मार्ग पोलिसांनी या प्रकरणी तत्काळ कारवाई करून आरोपीला अटक केली आहे. त्याची अधिक चौकशी सुरू आहे.
महिला कॅब ड्रायव्हरसोबत घडला अजब प्रकार, बिअरच्या बाटलीने छाती आणि गळ्यावर वार करत धक्कादायक कृत्य
2013मध्येही मुंबईत घडली होती अॅसिड हल्ल्याची भयानक घटना
2013 मध्ये घटलेल्या एका घटनेत प्रेमात अपयशी ठरलेल्या तरुणाने मुलीला अॅसिड पाजलं होतं. पीडित 18 वर्षीय तरुणी बोरिवलीतल्या महाविद्यालयात शिकत होती. आरोपी जितेंद्र सकपाळ हा तिच्या घराच्या शेजारी राहत होता. ही घटना घडवून आणण्यासाठी त्यानं मुलीला बळजबरीनं गोराई समुद्रकिनारी नेलं होतं. तिथे त्याने मुलीला बेदम मारहाण करून जबरदस्तीने अॅसिड पाजलं होतं. गुन्हा करून तो फरार झाला होता. प्रेमात अपयशी ठरलेल्या आरोपीने त्यापूर्वीही तरुणीला धमकावून मारहाण केली होती. त्या प्रकरणी तरुणीने दहिसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
शहरांमध्ये हळूहळू आता लिव्ह-इन रिलेशनशिपला समाजमान्यता मिळत आहे. त्यामुळे अविवाहित असून एकत्र राहणाऱ्या जोडप्यांची संख्या वाढत आहे. लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या आणि राहू इच्छिणाऱ्या जोडप्यांना त्यांच्या अधिकारांबद्दल आणि कायदेशीर बाबींबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. अन्यथा संकटाच्या काळात त्यांना मदत घेता येत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Shocking news