नालंदा, 4 ऑगस्ट : ग जमिनीच्या बांधावरून दोन गटामध्ये किरकोळ भांडणं सुरू होती. मात्र शब्दाला शब्द वाढत जाऊन दोन्ही गट आक्रमक झाले आणि दोन्हीकडून जोरदार गोळीबार (firing) करण्यात आला. यात 5 ग्रामस्थ ठार (5 dead) झाले असून दोनजण गंभीर जखमी (2 injured) झाले आहेत.
अशी घडली घटना
बिहारमधील नालंदाजवळ असणाऱ्या लोदीपूर गावात बुधवारी दोन गटात वाद झाले. जमिनीच्या मालकीवरून हा वाद सुरु झाला आणि या वादात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप करण्यात येऊ लागले. हळूहळू शिव्या सुरु झाल्या आणि प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं. दोन्ही गटातील लोकांनी बंदुका बाहेर काढल्या आणि एकमेकांवर फायरिंग सुरु केलं. एकूण सात जणांना गोळ्या लागल्या. त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
मृतांची नावं गुपित
या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून सर्व मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. गावात सध्या तणावाचं वातावरण असून पोलिसांनी मृतांची नावं अद्याप जाहीर केलेली नाहीत. काही ग्रामस्थांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. गावात सध्या भयाण शांतता असून प्रत्येकजण घाबरलेला आहे. गावात पोलीस तैनात करण्यात आले असून परिस्थिती चिघळू नये, याची काळजी घेतली जात आहे.
हे वाचा -छोट्या व्यापाऱ्यानं केलं मोठ्या व्यापाऱ्याच्या मुलाचं अपहरण
नालंद्यात एका आठवड्यात 7 खून
नालंदा परिसरात गेल्या आठवड्याभरात एकूण 7 जणांचा खून झाला आहे. या घटनेतील 5 जणांव्यतिरिक्त डुक्कर चोरीच्या वादातून एकाचा खून झाला होता. आणखी एका तरुणाला वैयक्तिक वादातून छातीत गोळ्या घालून संपवण्यात आलं होतं. बिहारमधील गुन्हेगारी वाढत चालल्याचं हे लक्षण असून ग्रामस्थ सध्या भीतीच्या सावटाखाली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.