बांसवाडा, 10 फेब्रुवारी: हृदय पिळवटून टाकणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वडिलांनी (father) आपल्या पोटच्या चार मुलांची निर्दयीपणे हत्या (Killed 4 son) करुन स्वतः आत्महत्या (Suicide) केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. या चारही निष्पाप मुलांचं वय 2 ते 6 च्या दरम्यान होतं. पोलिसांनी पाचही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 40 वर्षाच्या व्यक्तीनं आपल्या पोटच्या 4 मुलांची निर्घृण हत्या केली आहे. या चारही मुलांचं वय 2 ते 6 वर्षांच्या दरम्यान होतं. या मुलांना संपवल्यानंतर जन्मदात्या पित्याने घरातील सिलिंगला गळफास घेवून आत्महत्या केली आहे. यावेळी मृत व्यक्तीची पत्नी कामानिमित्त बाहेर गेली होती. ती घरी परतल्यानंतर घरात पाच मृतदेह पाहून तिला धक्काच बसला आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह ताब्यात घेतले. सदर घटना ही राजस्थानमधील बांसवाडा जिल्ह्यातील आहे. पोलीस अधीक्षक कवेंद्र सागर यांनी प्राथमिक माहितीच्या आधारे सांगितलं की, ‘संबंधित मृत व्यक्तीला दारूचं व्यसन होतं. तो दारुच्या नशेत अनेकदा आपल्या मुलांना आणि पत्नीला मारहाण करत असायचा. त्याचबरोबर बुधवारीही त्याचं आपल्या पत्नीबरोबर कडाक्याचं भांडण झालं होतं. त्यामुळेच त्याने दारुच्या नशेत आपल्या मुलांची हत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. आपल्या चारही मुलांची हत्या केल्यानंतर त्यांनी स्वतः आत्महत्या केली असावी, असंही पोलीस अधीक्षक कवेंद्र सागर यांनी सांगितलं. घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. त्यामुळे हत्येचं आणि आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही. मृतदेहांचं शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह संबंधित नातेवाईकांकडे देण्यात येतील अशी माहितीही सागर यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.