हैदराबाद 22 जून: लग्नाच्या आमंत्रण पत्रिकांमध्ये छापलेली नावं हा अनेकदा चर्चेचा विषय होतो. काही पत्रिका एकदम सुटसुटीत असतात. त्यात वधू-वर आणि त्यांचे आई-वडील यांच्याव्यतिरिक्त कोणाचीच नावं नसतात. काही पत्रिकांवर मात्र गावातल्या मान्यवरांपासून शुभेच्छुकांपर्यंत अनेकांची नामावळी असते. तो ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे. त्यावरून काहीवेळा रुसवे-फुगवेही होऊ शकतात; पण लग्नपत्रिकेत (Invitation Card) नाव न छापणं हे कोणाला भोसकण्याचं कारण होऊ शकतं का? तशी दुर्दैवी घटना हैदराबादमध्ये (Hyderabad) तुकारामगेट परिसरात रविवारी (20 जून) घडली आहे. चार व्यक्ती यात जखमी झाल्या असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या हवाल्याने 'लेटेस्टली'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
पती 4 वर्षांपासून शोधत होता 'सीमा'ला, पण 'सना' बनून तिने प्रियकरासोबत केला घरोबा
तुकारामगेट (Tukaramgate) पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर आर. येल्लप्पा यांनी याबद्दल अधिक माहिती दिली. तुकारामगेट परिसरातल्या आझाद चंद्रशेखर नगरमध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून काम करणारे शेखर (24) आणि सर्वेश (20) या दोघा आरोपींनी हे कृत्य केलं. 16 जून रोजी त्यांच्या एका नातेवाईकाचं लग्न होतं. लग्नाच्या आमंत्रणपत्रिकेत सर्व ज्येष्ठांची नावं होती; मात्र शेखर आणि सर्वेश यांच्या आई-वडिलांची नावं त्यात नव्हती. त्याचा राग शेखर आणि सर्वेश यांच्या मनात होता. त्यावरून त्यांचं आणि यादगिरी नावाच्या त्यांच्या एका नातेवाईकाचं भांडण झालं. या दोघा आरोपींनी यादगिरीच्या पत्नीमुळे आपल्या आई-वडिलांची नावं छापली गेली नसल्याचा आरोप केला. त्यातून वादाची ठिणगी आणखी पेटली.
अमरावती: घरातच लपलेली पत्नी, संशयातून पतीनं शेजाऱ्याच्या घरी केली जाळपोळ
नेमके कशावरून मतभेद झाले आहेत हे समजून घेण्यासाठी आणि हा वाद मिटवण्यासाठी यादगिरी यांच्यासह प्रवीण, परशुराम, प्रताप हे त्यांचे कुटुंबीय रविवारी सकाळी (20 जून) सात वाजता दोघा आरोपींच्या घरी आले. त्यावेळी शेखर आणि सर्वेश या आरोपींनी यादगिरीच्या पत्नीला उद्देशून असभ्य भाषेचा वापर केला. दोन गटांत झालेल्या भांडणावेळी शेखरने दुसऱ्या गटावर चाकूहल्ला केला. सर्वेशने त्याला साथ दिली. त्यात यादगिरी (Yadgiri) आणि प्रताप यांना किरकोळ जखमा झाल्या. प्रवीणच्या पोटात, तर परशुरामच्या छातीत चाकूने भोसकलं (Stabbed) गेल्याने गंभीर जखमा झाल्या. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर आता त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती इन्स्पेक्टरनी दिली. दरम्यान, आरोपी (Accused) शेखर आणि सर्वेश फरारी झाले आहेत. त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. त्यांच्याविरोधात भारतीय दंडविधान कलम (IPC Section) 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Hyderabad, Wedding