प्रमोद पाटील, प्रतिनिधी पनवेल, 31 जानेवारी : मुंबई जवळील पनवेलमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंडिया बुल्स सोसायटीमध्ये इमारतीच्या 8 व्या मजल्यावरून पडून एका 20 वर्षीय तरुणीची मृत्यू झाला आहे. तिने उडी मारून आत्महत्या केली की घातपात आहे, याबद्दलचा तपास पोलीस करत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेरी निरिश असं मृत मुलीचे नाव आहे. मेरी निरिश ही पनवेल मधील कोनगाव समोरील इंडिया बुल्समधील अस्टर इमारतीत 8 व्या मजल्यावर राहत होती. तिच्याकडे तिचा एक मित्र आला होता, त्याच वेळी ही घटना घडली. मेरी ही अमित युनिव्हर्सिटी फॅशन डिझायनिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. तर तिचा मित्र ही फोटोग्राफीचा कोर्स करत आहे. रविवार 29 जानेवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास इमारतीच्या बाल्कनीमधून मेरी अचानक खाली पडली. त्याच वेळी बाजूला असलेले सुरक्षारक्षक आणि इमारतीतील नागरिकांना ही बाब लक्षात आली. त्यांनी तिला तत्काळ पनवेल मधील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डोक्याला जबर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. संबंधित घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत चौकशी आणि तपास सुरू केला आहे. तिने स्वतःहून उडी मारून स्वतःला संपविले की, कुणाच्या दबावात हे कृत्य केले, कुणी तिला ढकलून दिले याबाबत अधिक तपास सुरू आहे. मात्र पोलिसांच्या तपासात ही घटना अपघात असल्याचे दिसून आले आहे. उतरताना तिचा हात घसरून ती खाली पडली असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र यात काही घातपात असेल तर खरं कारण लवकरच समोर येईल. 20 वर्षांच्या मेरी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.