मेक्सिको 23 जुलै : जगभरात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र यातील काही घटना अशा असतात, ज्या सगळ्यांनाच हादरवून सोडतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. मेक्सिकोमध्ये एका व्यक्तीने चक्क बारमध्ये आग लावल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. यात एका महिलेसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी या व्यक्तीला बारमधून बाहेर काढण्यात आलं होतं. मात्र, तो परत आला आणि त्याने संपूर्ण बार पेटवून दिला. अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितलं की, त्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. न्यूज एजन्सी AFP च्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या सीमेला लागून असलेल्या मेक्सिकोच्या उत्तरेकडील सोनोरा राज्याच्या सॅन लुइस रिओ कोलोरॅडो शहरात शनिवारी मध्यरात्री जाळपोळ झाल्याची घटना घडली. बारच्या जाळपोळीत सात पुरुष आणि चार महिलांचा होरपळून आणि गुदमरून मृत्यू झाला आहे. तर अन्य चार जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रियकराला अंधारात भेटण्यासाठी अख्ख्या गावाची लाईट घालवायची तरुणी, शेवटी पोलखोल झाली अन्.. सोनोराच्या राज्य अभियोक्ता कार्यालयाने सांगितलं की हल्लेखोराला महिलांसोबत चुकीचं वर्तन केल्याबद्दल बारमधून बाहेर काढण्यात आलं होतं. पण तो परत आला आणि बारला आग लावली. त्या व्यक्तीने बारवर एक ज्वलनशील वस्तू फेकली, ते मोलोटोव्ह कॉकटेल असण्याची शक्यता आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, राज्याचे ऍटर्नी जनरल गुस्तावो रोमुलो सालास यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, मृत महिलांपैकी एक अमेरिकन नागरिक आहे. “मॅक्सिकन आणि अमेरिकन दुहेरी नागरिकत्व असलेली महिला आणि केवळ 17 वर्षांची असलेली आणखी एक पीडित मुलगी या घटनेत ठार झाली,” असं ते म्हणाले. शहराचे महापौर सँटोस गोन्झालेझ यांनी सांगितलं की, संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. सोनोरा राज्य सरकारी वकिलांनी सांगितलं, की प्राथमिक तपासात असं दिसून आलं आहे की शनिवारी पहाटे झालेल्या हल्ल्याच्या वेळी संशयित पुरुष खूप मद्यधुंद होता आणि तेथील महिलांशी असभ्य वागल्याबद्दल त्याला बारमधून बाहेर काढण्यात आलं होतं. यानंतर त्याने बारला आग लावली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.