मॉस्को, 10 ऑगस्ट : जगभरात सध्या 1 कोटी 97 लाख कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्ण आहेत. थोड्याच दिवसात हा आकडा 2 कोटी होऊ शकतो. मात्र अद्यापही कोरोनावर लस (Vaccine) मिळालेली नाही आहे. जगभरातील सर्वच देश कोरोनाची लस शोधण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) दिलेल्या माहितीनुसार जगभरात 21 हून अधिक लशीच्या क्लिनिकल ट्रायल केल्या जात आहे. एकीकडे जगभरातील तज्ज्ञ त्यांच्या लशीच्या दुसर्या आणि तिसर्या टप्प्यात आहेत, तर रशियाने ही लस तयार असल्याचा दावा केला आहे. 2 दिवसांनंतर म्हणजे 12 ऑगस्ट रोजी या लशीची अधिकृत नोंदणी होणार असल्याचे वृत्त आहे. रशियानं केलेला दावा खरा असेल तर ही लस जगातील पहिली कोरोना लस असेल.
रशियामध्ये कोरोनाची लस ही रशियन आरोग्य मंत्रालयाशी संबंधित असलेल्या गमलेया संशोधन संस्थेनं तयार केली आहे. रशियन आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांच्या म्हणण्यानुसार जर त्यांची लस चाचणीत यशस्वी झाली तर ऑक्टोबरपासून देशात मोठ्या प्रमाणात उत्पादनही सुरू होईल. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने देशातील नागरिकांना दिलासा दिला आणि म्हटले की या लसीकरण मोहिमेतील सर्व खर्च सरकार करणार आहे.
वाचा-कोरोनाग्रस्तांसाठी BLOOD TEST महत्त्वाची ठरणार ; रुग्णाच्या मृत्यूचा धोका समजणार
रशियाचे उप-आरोग्यमंत्री ओलेग ग्रिडनेब यांनी सांगितले की लशीच्या चाचणीचा अंतिम टप्पा आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत या लसीने चांगले निकाल दिले आहेत मात्र अंतिम टप्पा अतिशय महत्वाचा आहे. ते म्हणाले की, लोकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणात विकसित होईल तेव्हाच ही लस यशस्वी झाली, असे मानता येईल. ओलेग ग्रिडनेब असेही म्हणाले की, आम्ही सर्व बाजूंनी तयारी केली आहे आणि 12 ऑगस्ट रोजी जगातील पहिली लस नोंदविली जाईल. रशियन शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की ज्या लोकांना क्लिनिकल चाचणी दरम्यान ही लस दिली गेली होती त्यांना कोरोना विषाणूशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती आढळली आहे.
वाचा-जगातील असा देश जेथे कोरोनाला No Entry; 100 दिवसात एकही नवा रुग्ण नाही
रशियाच्या लशीबाबत संशय
रशियाच्या लशीबाबत अनेक देशांनी संशयही व्यक्त केला आहे. जरी रशियन शास्त्रज्ञ लस नोंदवण्याबाबत बोलत असतील तर परंतु जगातील अनेक देश रशियाच्या लसीवर विश्वास ठेवत नाहीत. ब्रिटन आणि अमेरिकेसह बर्याच मोठ्या देशांतील तज्ज्ञांनी रशियाने तयार केलेल्या लसच्या सुरक्षेची आणि परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ब्रिटनने ही लस वापरण्यास नकार दिला आहे. या सर्व देशांमधील तज्ज्ञ रशियाच्या लशीबद्दल संशयी आहेत कारण त्यांनी या लशीच्या चाचणीशी संबंधित कोणताही वैज्ञानिक डेटा जाहीर केलेला नाही.