मुंबई, 19 जानेवारी: जगभरात कोरोनाच्या (Corona) परिस्थितीत कोणतीही सुधारणा होत नसल्याचं चित्र आहे. पण जागतिक आरोग्य संघटनेचे (World Health Organization) आपत्कालीन प्रमुख डॉ. मायकेल रायन (Dr. Michael Ryan) यांच्या म्हणण्यानुसार, यावर्षी कोरोनामुळे निर्माण झालेली सार्वजनिक आरोग्यविषयक आणीबाणीची स्थिती संपुष्टात येऊ शकते. 'डब्ल्यूएचओ'नं 2020 मध्ये कोरोनामुळे जागतिक आरोग्य आणीबाणी (World Health Emergency) घोषित केली आहे.
'जर गरीब आणि श्रीमंत देशांदरम्यान असलेली लशी (Vaccine) आणि औषधांच्या वितरणातील मोठी असमानता दूर केली तर यावर्षी कोरोना विषाणूचं संकट, मृत्यू, रुग्णालयात दाखल करणं आणि लॉकडाऊन थांबवता येईल', असं डॉ. रायन यांनी स्पष्ट केलं आहे.
विषाणू कधीच संपणार नाहीत
डॉ. रायन यांनी सांगितलं की, 'आपण या विषाणूला (Virus) आता नष्ट करू शकणार नाही. कारण हा विषाणू आपल्या परिसंस्थेचा भाग बनला आहे. परंतु, आपण काही गोष्टी करू शकलो तर सार्वजनिक आरोग्य आणीबाणी (Public Health Emergency) संपवण्याची चांगली संधी आपल्याला मिळू शकते. गरीब आणि श्रीमंत देशांमधील लस असमानता हे मोठं नैतिक अपयश आहे. एकीकडे श्रीमंत देशांमधील 80 टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत तर दुसरीकडे गरीब देशांतील 10 टक्के लोकांना अजून लसीचा एकही डोस मिळालेला नाही, ही स्थिती चिंताजनक म्हणावी लागेल', असं डॉ. रायन यांनी स्पष्ट केलं.
हे वाचा-धक्कादायक! कोरोना चाचणीसाठी नमुने घेत असतानाच सिंह आणि बिबट्याचा मृत्यू
आतापर्यंत 55 लाख नागरिकांचा मृत्यू
एका व्हर्च्युअल कॉन्फरन्समध्ये जागतिक पातळीवरील नेते आणि उद्योगपतींना संबोधित करताना डॉ. रायन म्हणाले, की 'आपण कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यात सामग्री आणि लशी पोहोचवल्या नाहीत, तर कोरोना महामारीची ही शोकांतिका आहे तशीच यापुढेही सुरू राहील. कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत 55 लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग कमी प्रमाणात व्हावा, तसंच कोरोनामुळे मृत्यू होऊ नये, यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत लस पोहोचवणं आवश्यक आहे'.
हे वाचा-राज्यात कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढला; मात्र समोर आली ही दिलासादायक बाब
सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणजे काय?
जेव्हा एखाद्या आजारामुळे विलक्षण परिस्थिती उदभवते तेव्हा सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली जाते. एखादा आजार महामारीचं (Pandemic) रुप धारण करून एका देशातून दुसऱ्या देशात पसरण्याची शक्यता वाढते. कोणत्याही रोग किंवा संसर्गाच्या अनुषंगानं आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी घोषित करण्यासाठी दोन निकष आहेत. यात पहिला निकष म्हणजे, रोगाचा धोका एकापेक्षा जास्त देशांमध्ये असणे आवश्यक आहे आणि दुसरा म्हणजे, या आजाराच्या प्रतिबंधासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य आणि समन्वित प्रयत्नांची गरज आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं आतापर्यंत 6 वेळा सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.