मुंबई 19 जानेवारी : राज्यात कोरोना रुग्णसंख्येत (Corona Cases in Maharashtra) पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. कोरोना रुग्णसंख्या मंगळवारीही 40 हजाराच्या जवळ पोहोचली आहे. मागील 24 तासांत राज्यात कोरोनाचे 39 हजार 207 नवीन रुग्ण समोर आले आहेत. सोमवारच्या तुलनेत हा आकडा एकदम 8 हजाराने वाढला आहे. मृतांचा आकडाही मंगळवारी 53 वर पोहोचला आहे. सोमवारी हा आकडा 24 वर होता. म्हणजेच एकाच दिवसात मृतांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे. मात्र, ओमायक्रॉनच्या बाबतीत राज्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे (Maharashtra Corona Updates).
राज्यात सोमवारी ओमायक्रॉनचे (Omicron Variant) 122 रुग्ण आढळले होते. मात्र, मंगळवारी ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मुंबईतील परिस्थितीबाबत बोलायचं झाल्यास मंगळवारी 6 हजार 149 नवीन रुग्ण समोर आले आहेत. सोबतच 12 हजार 810 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. म्हणजेच कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या तुलनेत बरं होणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट आहे. ही दिलासादायक बाब आहे.
भारतात कधी शिगेला पोहोचणार कोरोनाची तिसरी लाट? रोज येणार 7 लाखहून अधिक नवे रुग्ण
राज्यात मागील दोन दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत होती. यामुळे कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याची चर्चा सुरू झालेली. मात्र, याबाबत बोलताना राज्यातील कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर सुभा। साळुंके म्हणालेले, की जोपर्यंत मृतांचा आकडा पूर्ण आठवडाभर कमी येत नाही, तोपर्यंत असं म्हणणं चुकीचं ठरेल. अशात आता मृतांच्या संख्येतही वाढ झाल्याने चिंता वाढली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.95 टक्के झाला आहे.
आणखी एक लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, एकीकडे कोरोनाचे नवे 39 हजार 207 रुग्ण आढळलेले असतानाच दुसरीकडे कोरोनातून बरं होणाऱ्या रुग्णांची संख्या मंगळवारी 38 हजार 824 होती. राज्यात आतापर्यंत 68 लाख 68 हजार 816 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे सध्याचा रिकव्हरी रेट 94.32 टक्के आहे. राज्यात सध्या 23 लाख 44 हजार 919 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 2960 लोक इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आतापर्यंत 72 लाख 82 हजार 128 लोकांची कोरोना चाचणी झाली आहे.
Covid Symptoms: तज्ज्ञ सांगतात, Long Covid रुग्णांमधली ही लक्षणं चिंताजनक
मुंबईबद्दल बोलायचं झाल्यास मंगळवारी कोरोनाचे 6 हजार 149 नवीन रुग्ण समोर आले आहेत. म्हणजेच सोमवारच्या तुलनेत इथेही रुग्णसंख्येत काही प्रमाणात वाढ पाहायला मिळाली आहे. सोमवारी मुंबईत 5 हजार 556 रुग्ण आढळले होते. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी ७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र, दिलासादायक बाब ही आहे, की नव्या रुग्णसंख्येच्या तुलनेत कोरोनातून बरं होणाऱ्यांची संख्या दुप्पट आहे. सध्या मुंबईत रिकव्हरी रेट 94 टक्के आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.