नवी दिल्ली, 09 जानेवारी : जगभरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा (Corona) संसर्ग रोखण्यासाठी कापडी मास्क (Cloth Mask) वापरणं योग्य की N95 मास्क वापरणं याबाबत चर्चा होताना दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात येऊ लागताच अनेकांनी कापडी मास्क वापरण्यास सुरुवात केली. मात्र एरोसोल्स/ड्रॉपलेट्समुळे होणारा विषाणूचा (Virus) संसर्ग टाळण्यासाठी अनेकांनी सर्जिकल मास्क (Surgical Mask) किंवा N95 मास्कचा वापर कायम ठेवला. सध्या भारत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा (Third Wave) सामना करत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिक संसर्गापासून बचावासाठी प्रभावी मास्कचा पर्याय पडताळत आहेत. कापडी मास्कचा वापर करत असाल तर तुम्हाला बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास 20 मिनिटांत विषाणू संसर्ग होऊ शकतो, असं एका अभ्यासातून नुकतंच स्पष्ट झालं आहे.
या काळात N95 मास्क अधिक सुरक्षित असल्याचं निरीक्षण तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांनी नोंदवलं आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, मास्क परिधान न केलेली संसर्गग्रस्त व्यक्ती अन्य व्यक्तींपासून 6 फुटांच्या आत असेल तर ती केवळ 15 मिनिटांत इतरांना संसर्ग करू शकते. परंतु, दोघांनीही कापडी मास्क परिधान केला असेल तर ही वेळ 27 मिनिटांपर्यंत वाढेल. संसर्ग नसलेल्या व्यक्तीनं कापडी मास्क लावला असेल आणि संसर्ग झालेल्या व्यक्तीनं मास्क लावला नसेल तर ही वेळ 20 मिनिटांपर्यंत कमी होते. त्याचप्रमाणे कोरोनाबाधित व्यक्तीनं मास्क लावला नसेल आणि कोरोना संसर्ग नसलेल्या व्यक्तीनं सर्जिकल मास्क लावला असेल तर संसर्ग 30 मिनिटांत पसरू शकतो. तथापि, जर संसर्ग झालेली व्यक्ती आणि संसर्ग नसलेली व्यक्ती अशा दोघांनीही N95 मास्क लावला असेल तर विषाणूचा प्रसार (Transmission) होण्यास 25 तास लागतील.
हे वाचा - 'कोरोना लस न घेतलेल्यांना बेड्या ठोका', ओमिक्रॉनच्या संकटात सरकारनं काढलं फर्मान
अमेरिकन कॉन्फरन्स ऑफ गव्हर्नमेंटल इंडस्ट्रियल हायजिनिस्टने (ACGIH) दिलेल्या माहितीनुसार, स्रोत नियंत्रण म्हणून विचार करता रुग्णानं सर्जिकल मास्क परिधान करणं हा उत्तम पर्याय ठरतो. यामुळे ड्रॉपलेट्स/एरोसोल्समधील विषाणूपासून पूर्णतः संरक्षण होईल असं आश्वासन देता येत नाही. परंतु, प्रसार विशिष्ट पातळीपर्यंत निश्चितच मर्यादित राहू शकतो. जेव्हा तुम्ही मर्यादित वेळेपुरते इतरांच्या संपर्कात असता आणि बहुतांश वेळ घरातच असता तेव्हा सोर्स कंट्रोल (Source Control) म्हणून कापडी मास्कचा वापर करावा, असं एसीजीआयएचने स्पष्ट केलं.
तुम्ही N95 मास्क घातलेला आहे पण तुमच्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होऊ शकतो की नाही, असा विचार करत असाल तर त्यावर तज्ज्ञ म्हणतात, की एका व्यक्तीमुळे मास्क न लावलेल्या दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होण्यासाठी किमान 2.5 तास लागतात.
हे वाचा - कोरोनानंतर आता आणखी एक जीवघेणा व्हायरस; इथं आढळला खतरनाक RHDV2
कोरोनाच्या संसर्गाविरुद्ध N95 मास्क प्रमाणेच सर्जिकल मास्कमुळेदेखील चांगलं संरक्षण मिळतं. तुम्हाला कापडी मास्क वापरायचाच असेल तर उत्तम संरक्षणासाठी त्याला सर्जिकल मास्कचीही जोड देणं हितावह ठरेल. कोविड -19 विषाणू असलेले एरोसोल कापडी मास्कमुळे रोखले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे 4 ते 5 लेअर असलेला N95 मास्क वापरण्याची शिफारस केली जाते. डेल्टा व्हॅरिएंटच्या (Delta Variant) तुलनेत ओमिक्रॉन (Omicron) वेगानं पसरत आहे. लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींनाही या विषाणूचा संसर्ग होत आहे. त्यामुळे उत्तम संरक्षण देणारा मास्क लोकांनी वापरावा असा सल्ला दिला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona spread, Coronavirus, Face Mask, Mask