तैपई, 10 डिसेंबर : कोरोनाव्हायरस (Coronavirus) नेमका कुठून आला, याचं उत्तर अद्याप सापडलेलं नाही. अशाच कोरोनाचे वेगवेगळे व्हेरिएंट्स येत आहे. सध्या जगभरात ओमिक्रॉन थैमान घालतो आहे. अशात आता कोरोनाच्या एका नव्या प्रकरणामुळे चिंता वाढली आहे. उंदीर चावल्याने एका महिलेला कोरोना झाला आहे (Woman corona infection by mouse). त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
तैवानच्या बायो लॅबमध्ये काम करणाऱ्या एका महिलेला कोरोना चावल्यानंतर तिला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. 20 वर्षांच्या या महिलेची कोरोना टेस्ट गुरुवारी पॉझिटिव्ह आली. 23 नोव्हेंबरला या महिलेमध्ये कोरोनाचं पहिलं लक्षण दिसून आलं. तिला सौम्य खोकला होता. 6 डिसेंबरला तिला तीव्र खोकला सुरू झाला आणि तिची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. 9 डिसेंबरला तिच्या टेस्टचा रिपोर्ट आला आणि तिला कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटची लागण झाल्याचं निदान झालं.
तैवानच्या रोग नियंत्रण संस्थेचे प्रमुख चेन शिह-चुंग यांनी गुरुवारी रात्री याबाबत खुलासा केला आहे. ही महिला एकेडेमिया सिनिकातील बायो लॅबमधील कर्मचारी आहे. या महिलेला नोव्हेंबरमध्ये संक्रमित उंदीर दोन वेळा चावला होता. त्यामुळेच या महिलेला संक्रमण झाल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. पण अद्याप आरोग्य अधिकाऱ्यांनी याची पुष्टी करण्यास नकार दिला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.
हे वाचा - लहान मुलांना धोका? राज्यात 3.5 वर्षाच्या मुलाला Omicron ची लागण; नवे 7 रुग्ण
आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेने परदेशात कुठे प्रवासही केलेला नाही. गेल्या महिनाभरातील तैवानमधील कोरोनाव्हायरसच्या स्थानिक संसर्गाचं हे पहिलं प्रकरण आहे. या महिलेला लॅबमध्ये संक्रमित उंदीर चावल्याने कोरोना झाला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
उंदरामधून ओमिक्रॉनची उत्पत्ती झाल्याचा संशय
शास्त्रज्ञांच्या मते, सध्या थैमान घालणारा ओमिक्रॉन हा धोकादायक आणि संसर्गजन्य विषाणूचा प्रकार मानवेतर प्राण्यांच्या प्रजातींमधून आला असून, उंदरांमध्ये (Rodent) निर्माण झाला असण्याची दाट शक्यता आहे. STAT नावाच्या एका माध्यम संस्थेने याबाबत एक बातमी प्रकाशित केली असून, गेल्या वर्षीच्या मध्यात जेव्हा उंदराना कोरोनाची लागण झाली असेल त्या वेळी त्यांच्यामध्ये ओमिक्रॉनची उत्पत्ती झाली असावी, असं त्यात म्हटलं आहे.
हे वाचा - फक्त 'या' गोष्टीमुळे ओमिक्रॉनसारख्या कोरोनाचा धोकाही 225 पट कमी; तज्ज्ञांचा दावा
अनेक प्राण्यांमध्ये संसर्ग झालेल्या कोरोना विषाणूमधल्या उत्परिवर्तनानंतर हा विषाणू माणसांमध्ये आला असावा. या प्रक्रियेला रिव्हर्स झूनॉसिस (Reverse Zoonosis) असं म्हणतात, असं या वृत्तात म्हटलं आहे. मानवाकडून प्राण्यांकडे संसर्ग झालेल्या कोरोना विषाणूमध्ये 30 पेक्षा अधिक म्युटेशन्स होऊन हा ओमिक्रॉन तयार झाला असल्याचं मत स्क्रिप्स रिसर्च इन्स्टिट्यूटचे (Scripps Research Institute) इम्युनॉलॉजिस्ट क्रिस्टियन अँडरसन यांनी व्यक्त केलं आहे. रिव्हर्स झूनॉसिसनंतर पुन्हा झूनॉसिस झालं असावं आणि त्यानंतर मानवामध्ये याचा संसर्ग झाला असावा असंही क्रिस्टियन यांनी म्हटलं आहे. या सिद्धांताला दुजोरा देण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग अधिक सखोल पद्धतीनं करण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.
या ओमिक्रॉन विषाणूच्या बाह्य स्तरावरच 32 म्युटेशन्स (Mutation) झाली असल्याचं मानलं जात आहे. या 32 म्युटेशन्सपैकी 7 म्युटेशन्स उंदरांमध्ये संसर्ग करणारी आहेत, असं मत तुलेन मेडिकल स्कूलमधले (Tulane Medical School) मायक्रोबायोलॉजी आणि इम्युनॉलॉजीचे प्राध्यापक रॉबर्ट गॅरी यांनी व्यक्त केलं आहे; मात्र ओमिक्रॉन प्रकार प्राण्यांपासून उद्भवला आहे की मानवांमध्ये विकसित झाला आहे याबाबत संभ्रम असल्याचं रॉबर्ट गॅरी यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus