मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /फक्त या एका गोष्टीमुळेच Omicron सारख्या कोरोनाचा धोकाही 225 पटींनी कमी होतो; तज्ज्ञांचा दावा

फक्त या एका गोष्टीमुळेच Omicron सारख्या कोरोनाचा धोकाही 225 पटींनी कमी होतो; तज्ज्ञांचा दावा

फोटो सौजन्य - shutterstock

फोटो सौजन्य - shutterstock

ओमिक्रॉनसारख्या कोरोनाच्या व्हेरिएंटपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर ही गोष्ट नक्की करा.

    मुंबई, 09 डिसेंबर : कोरोनाचा (Corona) संसर्ग होऊ नये यासाठी सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing) आणि मास्क (Mask) या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, हे पहिल्यापासून वारंवार सांगितलं जात आहे. ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंटपासून बचाव करायचा असेल तर पुन्हा एकदा हात स्वच्छ धुणं, सोशल डिस्टन्सिंग याबरोबरच मास्क घालणंही किती महत्त्वाचं आहे, याचा तज्ज्ञांनी पुनरुच्चार केला आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका ताज्या अहवालातही यालाच दुजोरा देण्यात आला आहे. एकमेकांपासून तीन मीटरचं अंतर ठेवण्यापेक्षाही चेहऱ्यावर मास्क असेल तर कोरोना संसर्गाचा धोका 225 पटींनी कमी होतो, असा दावा या अभ्यासात संशोधकांनी केला आहे.

    चेहरा झाकल्यानं म्हणजेच मास्क घातल्यामुळे जास्त संरक्षण होतं असं जर्मनी आणि अमेरिकेत नुकत्याच झालेल्या संशोधनातून समोर आलं आहे. एखाद्या संसर्ग झालेल्या व्यक्तीपासून आपण तीन मीटर अंतरावर पाच मिनिटांसाठी उभे असलो आणि दोघांनीही मास्क घातला नसेल तर कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका 90 टक्के असतो; मात्र दोघांपैकी कोणीही सर्जिकल मास्क घातला असेल तर हीच शक्यता 90 मिनिटांपर्यंत पुढे जाते. तसंच दोघांनीही मेडिकल ग्रेड FFP2 मास्क घातला असेल आणि पुरेशा अंतरावर उभे असतील तर एक तास त्या अंतरावर उभे राहिल्यानंतरही व्हायरसचा संसर्ग होण्याचा धोका 0.4 टक्केच राहतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ओमिक्रॉन व्हॅरिएंटच्या बाबतीतही हे लागू आहे.

    हे वाचा - Alert! भारतात Omicron रुग्णांमध्ये एका बाबतीत साम्य; दिलासा नव्हे धोक्याची घंटा

    सोशल डिस्टन्सिंग मास्कपेक्षा कमी परिणामकारक आहे, असं गोटिंगेन आणि कॉर्नेल विद्यापीठातल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मास्कचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला, तर संसर्गाचा दर 50 टक्के कमी होऊ शकतो असंही एका मोठ्या अभ्यासातून पुढे आलं आहे. नुसत्या सोशल डिस्टन्सिंगमुळे मिळणाऱ्या संरक्षणापेक्षा हे दुप्पट आहे. PNAS जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या पेपर्समध्ये रेस्पिरेटरी पार्टिकल्स म्हणजेच कणांचं प्रमाण आणि आकार मोजण्यात आला होता. यानंतर धोका किती होऊ शकतो हे गणितीय मॉडेलच्या माध्यमातून मोजण्यात आलं.

    फक्त सोशल डिन्स्टन्सिंग पाळण्याऐवजी मास्कचा वापर करणं अधिक फायदेशीर असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे. मास्क किती घट्ट आणि मजबूत आहे यावर कोरोनाच्या संसर्गाचा धोका अवलंबून आहे, असं यात म्हटलं आहे. संसर्ग झालेली व्यक्ती आणि निरोगी व्यक्ती अशा दोघांनीही व्यवस्थित बसणारे FFP2 मास्क घातले असतील, तर 1.5 मीटरच्या अंतरावरूनही 20 मिनिटांपर्यंत धोका प्रति 1000 मध्ये एक इतकाच उरतो. दोघांनीही सैल मास्क घातले असतील तर धोका 4 टक्क्यांनी वाढेल. दोघांनीही व्यवस्थित बसणारे सर्जिकल मास्क घातले असतील, तर 20 मिनिटांनंतर सर्वांत जास्त धोका 10 पैकी एकाला असेल. सैल बसणारे सर्जिकल मास्क घातले असतील तर धोका 30 टक्के असू शकतो.

    हे वाचा - आता लहान मुलांना विळख्यात घेतोय कोरोना; आठवडाभरात झालेली स्थिती चिंताजनक

    एकूणच कोरोना अजून पूर्ण गेलेला नाही. त्यामुळे पुन्हा संसर्ग होऊ नये यासाठी मास्क नक्की वापरा आणि संसर्गापासून दूर राहा. त्यासाठी मास्क वापरा. मास्क घालतानाही तो नाकाच्या वर घट्ट बसेल असा व्यवस्थित घाला. सैल, फाटलेला, नाकाच्या खाली असा मास्क घालू नका, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

    First published:

    Tags: Corona, Coronavirus, Health, Lifestyle