नवी दिल्ली, 05 मे: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार (Second Wave of Coronavirus in India) माजला आहे. सरकारवर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. विरोधकही पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी आखलेल्या नियोजनावर दिवसागणिक ताशेरे ओढत आहेत. पण आता सरकारवर त्यांच्याच पक्षातील खासदाराने टीका केली आहे. कोरोनाची वाढती प्रकरणं, ऑक्सिजनचा तुटवडा यासांरख्या विविध प्रश्नांना अनुसरून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना या साथीच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी नेतृत्व करण्याची आज्ञा द्यावी अशी मागणी पंतप्रधानांकडे केली आहे. यावेळी त्यांनी PMO वर अवलंबून राहणं निरुपयोगी (Useless) असल्याचं म्हटलं आहे. स्वामी यांनी ट्वीट करत त्यांचे विचार मांडले आहेत. स्वामींनी केलेल्या या ट्वीटनंतर राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे.
India will survive Coronavirus Pandemic as it did Islamic invaders and British Imperialists. We could face one more wave that targets children unless strict precautions now are taken. Modi should therefore delegate the conduct of this war to Gadkari. Relying on PMO is useless
— Subramanian Swamy (@Swamy39) May 5, 2021
सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, ‘इस्लामिक आक्रमणं आणि ब्रिटीश साम्राज्यवादानंतरही ज्याप्रमाणे भारत जगत राहिला त्याप्रमाणे कोरोनाव्हायरस पँडेमिकमध्ये देखील जगेल. आता कडक खबरदारी न घेतल्यास आपल्याला आणखी एका लाटेचा सामना करावा लागेल जी लहान मुलांना लक्ष्य करू शकते. म्हणून मोदींनी या युद्धाची जबाबदारी गडकरींकडे सोपवावी. पीएमओवर अवलंबून राहणे निरुपयोगी आहे.’ देशात कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. यावेळी राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी देखील पत्र लिहित सरकारवर टीका केली आहे. अशावेळी स्वामी यांनी देखील सरकारवर एक प्रकारे टीका करणं राजकीय खळबळ निर्माण करणारं आहे.