नवी दिल्ली 23 मार्च : भारतात कोरोना लसीकरण (Corona Vaccination) मोहिमेला सुरुवात होऊन दोन महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. सरकारने नुकत्याच केलेल्या संशोधनात दावा करण्यात आला आहे, की लोकांमध्ये लसीच्या वापराबाबत भीती आहे. या अस्वस्थतेमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ नोंदवली जाण्याची शक्यता आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहिली तर बहुतेक लोक लस घेण्यास इच्छुक आहेत. अशात असा प्रश्न उपस्थित होतो, की भारताला लसीकरणाबाबत आपलं धोरण (Changes in Vaccination Policy) बदलण्याची गरज आहे का? इनस्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थचे अध्यक्ष दिलीप मावलनकर यांच्या म्हणण्यानुसार, भारताला आपलं कोरोना लसीकरणाचं धोरण बदलण्याची गरज आहे. कारण याच वेगाने लसीकरण सुरू राहिलं तर भारतातील लोकांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात बराच काळ जाऊ शकतो. लसीकरणाच्या धोरणामध्ये बदल करत काही भाग किंवा शहरांवर लक्ष केंद्रीत करून वेगानं लसीकरण करून घ्यायला हवं. एम्सच्या डॉ. रणदीप गुलेरिया यांचं असं म्हणणं आहे,की आमच्याकडे इतक्या प्रमाणात लस उपलब्ध नाही. ज्यानं जुलैपर्यंत लोकांना डोस दिला जाऊ शकेल. यावरुन देशात लस निर्मितीच्या कामालाही वेग येणं आवश्यक असल्याचं लक्षात येतं. सरकारकडून सध्याच्या लसीकरणाच्या टप्प्यात तब्बल तीस कोटी लोकांनी लस देण्याचं ध्येय देण्यात आलं आहे, म्हणजेच यासाठी ६० कोटी डोसची गरज पडेल. आतापर्यंत भारतात केवळ दोन लसींनाच परवानगी मिळाली आहे. दिल्लीच्या नेफ्रोन रुग्णालयाचे डॉ. संजीव म्हणाले, की आता लसीकरण अनलॉक करण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या नव्या लाटेचा वेग पाहाता लसीकरणही चार ते पाच पटीनं वाढवण्याची गरज आहे. इतकंच नाही तर तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे, की ज्या देशांमध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे तिथे प्रत्येक व्यक्तीला लस दिली गेली पाहिजे. यात महाराष्ट्रातील अनेक शहरं सामील आहेत. सध्या भारतात जवळपास 40 हजार केंद्रावर कोरोना लसीकरण मोहिम सुरू आहे. सोमवारपर्यंत देशात 4.5 कोटीहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. जवळपास 75 लाख लोक असे आहेत, ज्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत भारतानं एका दिवसात सर्वाधिक ३० लाख लसीचे डोस देण्याचं काम केलं आहे. नुकतंच सरकारनं लसीकरणाबाबत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. यानुसार आता पहिल्या आणि दुसऱ्या लसीच्या डोसमधील अंतर एका महिन्यावरुन वाढवून दोन महिने करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.