कोरोनामुक्त झाल्यानंतर हिरड्या, नाकातून होणाऱ्या रक्तस्रावाकडे दुर्लक्ष नको

कोरोनामुक्त झाल्यानंतर हिरड्या, नाकातून होणाऱ्या रक्तस्रावाकडे दुर्लक्ष नको

हे लाँग कोविडचं (Long covid) लक्षण आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 जून : 'कोरोनाचा संसर्ग झालेला असताना वेगवेगळ्या प्रकारची गुंतागुंत होतेच; पण संसर्ग बरा (Post covid) झाल्यानंतरही बराच काळ अनेक वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम भोगावे लागू शकतात. या लक्षणांना लाँग कोविड (Long covid) असंही म्हटलं जात आहे. यामध्ये रक्ताच्या गुठळ्या (Blood Clots) होणं आणि प्लेटलेट्ससारख्या (Platelets) महत्त्वाच्या रक्तघटकात अचानक घट होणं हे प्रकार कोविडनंतर रुग्णांमध्ये घडू शकतात.

कोविड-19मधून बरे झालेल्या आणि खासकरून ज्येष्ठांना रक्तात गुठळ्या होण्याचा, तसंच हृदयाशी संबंधित गुंतागुंत तयार होण्याचा धोका असल्याचं दिल्लीच्या मणिपाल हॉस्पिटल्समधल्या क्लिनिकल हिमॅटोलॉजी विभागातल्या कन्सल्टंट आणि हिमॅटॉलॉजिस्ट (Haematologist) डॉ. दिव्या बन्सल यांनी सांगितलं.

'कोविड (Covid19) होऊन गेल्यानंतर तीन महिन्यांपर्यंत रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका असू शकतो, असं ताज्या संशोधनात आढळलं आहे. वयोवृद्ध, तसंच हृदयविकार असलेल्यांना, गंभीर किडनीविकार असलेल्यांना, रक्तातल्या गुठळ्यांचा ज्ञात-अज्ञात इतिहास असलेल्या आणि कोरोना संसर्गादरम्यान अतिदक्षता विभागात दाखल करावं लागलं होतं, अशा व्यक्तींमध्ये हा धोका जास्त प्रमाणात असू शकतो,' असं त्यांनी सांगितलं.

हे वाचा - सावधान! Corona रुग्णांमध्ये दिसते आहे केसगळती आणि झोप न लागण्याची समस्या

'थ्रॉम्बोसायटोपेनिया (Thrombocytopenia) किंवा प्लेटलेट्समध्ये थोडी घट होणं हा प्रकार कोरोनाचा संसर्ग झालेला असताना तर दिसून येतोच; पण हा प्रकार पुढे सहा महिन्यांपर्यंत केव्हा दिसून येऊ शकतो किंवा कायम राहू शकतो. त्यांपैकी अनेक रुग्णांना लक्षणं नसल्यामुळे त्यांना कोणतीही औषधं लागत नाहीत. काही मोजक्या रुग्णांमध्ये अचानक प्लेटलेटची संख्या घटते. किंवा त्यांच्या त्वचेतून, नाकातून, हिरड्यांतून रक्तस्राव होतो. मलमूत्राद्वारे रक्त पडू लागतं. अशा रुग्णांना उपचारांची गरज भासते,' असं डॉ. बन्सल यांनी नमूद केलं.

पांढऱ्या रक्तपेशींचं प्रमाण घटणं, हिमोग्लोबिन कमी होणं किंवा बोन-मॅरो सप्रेशन असे प्रकारही कोविडनंतर काही रुग्णांच्या बाबतीत घडतात. 'हाय रिस्क पेशंटच्या बाबतीत तीन महिन्यांपर्यंत अँटीकोअॅग्युलेशन (Anticoagulation) सुरू ठेवणं उपयुक्त ठरतं. रक्तस्रावाचा धोका असल्याने असा पेशंटनी फॉलो-अप तपासणी सातत्याने करून घेणं गरजेचं असतं,' असं डॉ. म्हणाल्या.

हे वाचा - फक्त एक भारतीय औषध, सर्व व्हेरिएंट्सचं काम तमाम; कोरोनाविरोधी लढ्यात मोठं हत्यार

'प्लेटलेट्सची संख्या कमी असलेल्या रुग्णांची प्लेटलेट्सची संख्या आणखी कमी होऊ शकते. अशा पेशंटना लक्षणं नसतात. त्यांना ऑब्झर्व्हेशनखाली ठेवावं लागतं. त्यांच्या प्लेटलेट्सचं प्रमाण अचानक सुधारू शकतं. थ्रोम्बोसायटोपेनिया तीव्र स्वरूपात असल्यास आणि रक्तस्राव होत असल्यास विशिष्ट प्रकारची ट्रीटमेंट करावी लागते,' असं डॉ. बन्सल यांनी सांगितलं.

Published by: Priya Lad
First published: June 17, 2021, 8:34 AM IST

ताज्या बातम्या