ब्रिटन, 28 मे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग (Coronavirus in children) होण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे आता लहान मुलांनाही कोरोनापासून वाचण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. आतापर्यंत प्रौढांना दिली जाणारी कोरोना लस लहान मुलांना (Children corona vaccination) देण्याचे प्रयत्न सुरू झाले. दरम्यान आता लहान मुलांच्या कोरोना लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. लहान मुलांसाठी पहिल्या कोरोना लशीला मंजुरी (Corona vaccine approved for children) देण्यात आली आहे.
फायझरची कोरोना लस (Pfizer corona vaccine) लहान मुलांना देण्यासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. या लशीच्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. युरोपिअन मेडिकल एजन्सीने शुक्रवारी ही परवानगी दिली आहे. 12 ते 15 वयोगटातील मुलींना ही लस दिली जाणार आहे, अशी माहिती मिळते आहे.
#BREAKING EMA approves Pfizer vaccine for 12- to 15-year olds: official pic.twitter.com/10AeFkNpOT
— AFP News Agency (@AFP) May 28, 2021
फायझर आणि बायोएनटेकने तयार केलेली ही लस तरुणांवरही प्रभावी असल्याचं आढळलं होतं. यानंतर मार्चमध्ये फायझरने 12-15 या वयोगटातील 2260 स्वयंसेवकांवर झालेल्या चाचण्यांचे प्राथमिक निकाल जाहीर केले होते. ही लस दिलेल्या 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या तरुणांच्या तुलनेत त्यापेक्षा कमी वयाच्या लोकांना कोरोनाची लागण फार झाली नाही, असं आढळलं.
हे वाचा - फक्त एका डोसमध्येच कोरोनाचा खात्मा; जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल शॉट लशीला मंजुरी
त्यानंतर मे महिन्याच्या सुरुवातीला कॅनडामध्ये या लशीचा लहान मुलांवर वापर करण्यासाठी परवानगी देण्यात आली आणि 12 पेक्षा जास्त वयोगटातील मुलांना कोरोना लस देणारा कॅनडा पहिला देश ठरला होता. त्यावेळी या लशीचं युरोपियन युनियनमार्फत लहान मुलांवर ट्रायल सुरू होतं.
12 पेक्षा जास्त वयाच्या मुलांचं लसीकरण महत्त्वाचं का आहे?
बालरोगतज्ज्ञ आणि मुलांमधील संसर्गजन्य आजार या विषयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. जेम्स वुड(Dr. James Wood) यांनी मुलांना कोरोनाची बाधा होण्यापासून ते त्यांच्यामार्फत त्याचा संसर्ग पसरविण्याचा धोका, लस देण्याची गरज आणि उपलब्धता या सर्व मुद्द्यांबाबत माहिती दिली आहे.
डॉ. वुड म्हणाले, मुलांमध्ये विशेषत: लहान मुलांमध्ये कोविडची लागण होण्याचं आणि त्यांच्याद्वारे संसर्ग पसरण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की मुलांना संसर्ग होण्याचा धोका नाही. 12 वर्षाखालील मुलांना कोविडचा संसर्ग झाल्यास त्यांना अगदी कमी त्रास होतो, अनेकदा लक्षणंही दिसत नाहीत.
हे वाचा - 1 जूननंतरही अनलॉक नाही, कॅबिनेटच्या बैठकीत सरकारी-शासकीय कार्यालयांबाबत काय ठरलं
किशोरवयीन म्हणजे टीनएजमधील (Teenagers) मुलांना कोविड संसर्गाचा धोका लहान मुलांपेक्षा थोडा अधिक असतो. 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांपेक्षा टीनएजमधील मुलांना कोविड-19 ची लागण होण्याचं प्रमाण दुप्पट असल्याचं रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या (Centers for Disease Control and Prevention) अभ्यासात आढळलं आहे, असं त्यांनी सांगितलं.
मोठी मुलं आणि लहान मुलं यांच्यामध्ये कोविड-19चा संसर्ग होण्याच्या प्रमाणात तफावत असण्यामागे काय कारणं आहेत? याचा शोध घेण्याचा प्रयत्न संशोधक करत आहेत. यामध्ये वर्तन (Behavior) हा महत्त्वाचा घटक आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. टीनएजमधील मुले मोठ्या प्रमाणात घराबाहेर असतात, लोकांच्या संपर्कात येतात, तसंच ती किती काटेकोरपणे मास्क घालतात याबाबत साशंकता आहे. त्याचप्रमाणे त्यांची रोग प्रतिकारक शक्ती आणि जीवशास्त्रीय घटक देखील महत्त्वाची भूमिका बजावतात.
भारतात मुलांचं लसीकरण कधी?
भारतात सध्या दोनच लशींना परवानगी मिळाली आहे. त्यापैकी एकाही लशीच्या लहान मुलांवरच्या ट्रायल्सचा डेटा उपलब्ध झालेला नाही. दोन ते 18 या वयोगटातल्या मुलांवर लशीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्या घेण्यासाठी भारत बायोटेकला (Bharat Biotech) भारतीय औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे. लवकरच या चाचण्या सुरू होतील. अॅस्ट्राझेनेका कंपनीच्या लशीच्याही ट्रायल्स सहा ते 17 या वयोगटासाठी सुरू आहेत; मात्र त्याचा डेटा अद्याप हाती आलेला नाही.
फायझरने मे महिन्याच्या सुरुवातीला सांगितलं, की आपल्या लशीला भारतात परवानगी मिळण्यासाठी सरकारी यंत्रणेबरोबर चर्चा सुरू आहे. दरम्यान, कर्नाटकातल्या बेळगावमधल्या 20 मुलांना झायडस कॅडिला (Zydus Cadilla) या कंपनीच्या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचणीचा भाग म्हणून झायकोव्ह-डी या लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Coronavirus