मुंबई, 03 डिसेंबर : सध्या जगभरात कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारानं (Corona Variant) पुन्हा दहशत निर्माण केली आहे. ओमिक्रॉन (Omicron) असं त्याचं नाव असून, दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा हा नवीन उत्परिवर्तित प्रकार (Corona Mutated Variant) आढळला आहे. आधीच्या डेल्टा या घातक प्रकारापेक्षाही ओमिक्रॉन अधिक घातक असल्याचं मानलं जात आहे. या विषाणूची लागण झालेली एक व्यक्ती 35 ते 45 व्यक्तींना संक्रमित करू शकते. त्यामुळे या विषाणूचा संसर्ग अत्यंत वेगाने पसरत आहे. अवघ्या नऊ दिवसांत 30 देशांमध्ये याचा प्रसार झाला आहे. यामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आपल्या देशातही ओमिक्रॉनची लागण झालेले दोन रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर जगभरातले संशोधक या विषाणूचा उगम, त्यावरचे प्रभावी उपाय याबाबत संशोधन करत आहेत. याचदरम्यान, ओमिक्रॉनची निर्मिती उंदरांमध्ये झाली असल्याचा एक सिद्धांत मांडला जात आहे.
शास्त्रज्ञांच्या मते, हा धोकादायक आणि संसर्गजन्य विषाणूचा प्रकार मानवेतर प्राण्यांच्या प्रजातींमधून आला असून, उंदरांमध्ये (Rodent) निर्माण झाला असण्याची दाट शक्यता आहे. STAT नावाच्या एका माध्यम संस्थेने याबाबत एक बातमी प्रकाशित केली असून, गेल्या वर्षीच्या मध्यात जेव्हा उंदराना कोरोनाची लागण झाली असेल त्या वेळी त्यांच्यामध्ये ओमिक्रॉनची उत्पत्ती झाली असावी, असं त्यात म्हटलं आहे. अनेक प्राण्यांमध्ये संसर्ग झालेल्या कोरोना विषाणूमधल्या उत्परिवर्तनानंतर हा विषाणू माणसांमध्ये आला असावा. या प्रक्रियेला रिव्हर्स झूनॉसिस (Reverse Zoonosis) असं म्हणतात, असं या वृत्तात म्हटलं आहे.
रिव्हर्स झूनॉसिस समजून घेण्यासाठी झूनॉसिस प्रक्रिया समजून घेणं महत्त्वाचं आहे. झूनॉसिस म्हणजे प्राण्यांमधून मानवामध्ये विषाणूचा संसर्ग होणं, तर रिव्हर्स झूनॉसिस म्हणजे मानवाकडून प्राण्यांमध्ये विषाणूचा संसर्ग होणं आणि त्या विषाणूच्या उत्परिवर्तित प्रकाराचा संसर्ग पुन्हा मानवाला होणं. ओमिक्रॉनची निर्मिती अशा रिव्हर्स झूनॉसिसमधून झाली असावी असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. मानवाकडून प्राण्यांकडे संसर्ग झालेल्या कोरोना विषाणूमध्ये 30 पेक्षा अधिक म्युटेशन्स होऊन हा ओमिक्रॉन तयार झाला असल्याचं मत स्क्रिप्स रिसर्च इन्स्टिट्यूटचे (Scripps Research Institute) इम्युनॉलॉजिस्ट क्रिस्टियन अँडरसन यांनी व्यक्त केलं आहे. रिव्हर्स झूनॉसिसनंतर पुन्हा झूनॉसिस झालं असावं आणि त्यानंतर मानवामध्ये याचा संसर्ग झाला असावा असंही क्रिस्टियन यांनी म्हटलं आहे. या सिद्धांताला दुजोरा देण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग अधिक सखोल पद्धतीनं करण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. या ओमिक्रॉन विषाणूच्या बाह्य स्तरावरच 32 म्युटेशन्स (Mutation) झाली असल्याचं मानलं जात आहे.
हे वाचा - Omicron विरुद्ध लढण्यासाठी Covaxin लस अधिक प्रभावी: ICMR
या 32 म्युटेशन्सपैकी 7 म्युटेशन्स उंदरांमध्ये संसर्ग करणारी आहेत, असं मत तुलेन मेडिकल स्कूलमधले (Tulane Medical School) मायक्रोबायोलॉजी आणि इम्युनॉलॉजीचे प्राध्यापक रॉबर्ट गॅरी यांनी व्यक्त केलं आहे; मात्र ओमिक्रॉन प्रकार प्राण्यांपासून उद्भवला आहे की मानवांमध्ये विकसित झाला आहे याबाबत संभ्रम असल्याचं रॉबर्ट गॅरी यांनी म्हटलं आहे. कोरोना विषाणूच्या पहिल्या प्रकारातल्या म्हणजे अल्फा व्हॅरिएंटमध्येही 7 म्युटेशन्स झाली होती, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. ओमिक्रॉन प्रकारात उंदरांना संसर्ग करणारं जनुक असल्याची पुष्टी झाली असून, या प्रकारात जितकी म्युटेशन्स झाली आहेत, तेवढी अन्य व्हॅरिएंटमध्ये झालेली नाहीत. त्यामुळे हा प्रकार उंदरांमध्ये निर्माण झाला असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
रिपोर्टनुसार अॅरिझोना विद्यापीठातले उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ माइक व्होरोबी यांच्या मते हा एक अतिशय आश्चर्यकारक प्रकार आहे. कारण हा मानवाव्यतिरिक्त इतर प्राण्यांमध्ये आजार निर्माण करू शकत असेल तर माणसामध्ये किती गंभीर आजार निर्माण करील याची कल्पनाच केलेली बरी. तसंच याच्यामुळे आणखी नवीन प्रकार येण्याचीही शक्यता आहे. कमी प्रतिकारशक्ती असलेल्या मानवांपासून याची निर्मिती झाली असल्याचं व्होरोबी यांचं म्हणणे असून, उंदरात याची निर्मिती झाली असावी, यावर त्यांचा विश्वास नाही. कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या मानवाच्या शरीरात कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर त्यामध्ये अनेक म्युटेशन्स झाली आणि त्यातूनच हा नवीन अधिक घातक ओमिक्रॉन (Origin of Omicron) निर्माण झाला असल्याचा सिद्धांतही सर्वत्र मांडला जात आहे.
हे वाचा - Omicron चा धोका खरंच किती मोठा? भारतात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे का?
दरम्यान, बर्लिनमधल्या चॅराइट युनिव्हर्सिटी हॉस्पिटलचे (Charite University Hospital) विषाणूशास्त्रज्ञ ख्रिश्चन ड्रॉस्टेन यांनी हे दोन्ही सिद्धांत नाकारले आहेत. त्यांच्या मते, ओमिक्रॉन पहिल्यांदा कमकुवत व्हायरल सर्व्हिलन्स असलेल्या लोकसमूहात आला असावा. तिथेच त्याचा विकास झाला आणि त्याचा संसर्ग झाला असावा. हा विषाणू दक्षिण आफ्रिकेत उद्भवला नसावा, असंही त्यांचं ठाम मत आहे. कारण तिथे मोठ्या प्रमाणात जीनोम सिक्वेन्सिंग सुरू होतं; मात्र हिवाळ्याच्या काळात दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिणेकडच्या दुर्गम प्रदेशात याचा विकास झाला असावा, अशी शक्यता त्यांनी नमूद केली आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्गचे उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ अँड्र्यू रॅमबॉट यांनी म्हटलं आहे, की कोरोनाच्या काळात जगात अशी कोणतीही जागा असू शकत नाही, जिथे नवीन विषाणू विकसित होईल आणि कोणाला ते कळणार नाही. दक्षिण आफ्रिकेत इतरही अनेक आजार असल्यानं कोरोनाला अधिक गांभीर्याने घेतलं जात आहे. त्यामुळे तिथं सतत जीनोम सिक्वेन्सिंग सुरू असतं. त्यामुळे तिथे नवीन विषाणू निर्माण झाला आणि ते लपून राहिलं असं होणार नाही, असं रॅमबॉट यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus