नवी दिल्ली, 6 डिसेंबर : देशात कोरोना (Corona) विषाणूचा नवा व्हेरियंट (Variant) ओमिक्रॉनचा (Omicron) धोका वेगानं वाढत आहे. दररोज या व्हेरियंटनं बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मागील 4 दिवसांचा विचार करता ओमिक्रॉनचे 21 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जी स्थिती निर्माण झाली होती, ती पाहता केंद्र सरकार आणि तज्ज्ञ तिसऱ्या लाटेबाबत (Third Wave) जागरूक झाले आहेत. कोरोनाचा नवा ओमिक्रॉन व्हेरियंट बघता देशात लसीच्या बूस्टर डोसची (Booster Dose) चर्चा सुरू झाली आहे. केंद्र सरकार आणि आरोग्य मंत्रालय एकीकडे लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेण्याचं आवाहन करत असतानाच बूस्टर डोसबाबतही महत्त्वाच्या बैठका होत आहेत.
सध्या तरी बूस्टर डोसची गरज नाही, असं आरोग्यविषयक जर्नल लॅन्सेटमध्ये (Lancet) ऑक्टोबरमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात नमूद करण्यात आलेलं आहे. मात्र, जर कोरोनाचा अजून नवा आणि धोकादायक स्ट्रेन आढळून आला तर बूस्टर डोसची गरज भासू शकते, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्या लसीचा बूस्टर डोस अधिक प्रभावी ठरेल, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होत आहे. आम्ही जर कोविशिल्ड (Covishield), कोव्हॅक्सिन (Covaxin) किंवा स्पुटनिक (Sputnik) या लसीपैकी एका लसीचे (Vaccine) दोन्ही डोस घेतले असतील तर बूस्टर डोस दुसऱ्या कंपनीच्या लसीचा घेऊ शकतो का, असा प्रश्न लोक विचारत आहेत.
Omicron corona variant: भारतात वेगानं पसरतोय ओमिक्रॉन; 5 राज्यात आढळले 21 रुग्ण
याबाबत दिल्लीतील एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या सल्ल्यानुसार, ``जर तुम्ही कधी बूस्टर डोस घ्यायला गेलात आणि तो जर दुसऱ्या कंपनीचा लसीचा असेल तर अधिक फायदेशीर ठरू शकतो``. याचाच अर्थ असा की जर तुम्ही कोविशिल्डचे दोन डोस घेतले असतील तर बूस्टर डोस कोव्हॅक्सिनचा घ्यावा किंवा कोव्हॅक्सिनचे दोन डोस घेतले असतील तर बूस्टर डोस कोविशिल्डचा घेणं फायदेशीर ठरेल.
आज (6 डिसेंबर) होणाऱ्या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या (NTAGI) महत्त्वाच्या बैठकीत कमकुवत रोगप्रतिकार शक्ती असलेल्या व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस देण्याच्या मुद्द्यावर विचार केला जाणार आहे. प्राथमिक लसीकरण झाल्यानंतर देखील रोग प्रतिकारक शक्ती कमी झाल्याचे दिसून आल्यास पूर्वनिश्चित कालावधीनंतर अशा व्यक्तीला बूस्टर डोस दिला जातो. तसेच प्राथमिक लसीकरण संसर्ग आणि रोगास प्रतिबंध करू शकत नाही, तसेच त्यापासून पूर्णतः संरक्षण होत नाही आणि रोगप्रतिकारक शक्तीदेखील कमकुवत आहे, अशा व्यक्तींना देखील बूस्टर डोस दिला जातो. अलिकडेच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SII) कोरोना विषाणू संसर्गाविरुध्द बूस्टर डोस म्हणून कोविशिल्डला मंजुरी द्यावी अशी मागणी औषध नियमकांकडे केलेली आहे.
Omicron Effect: US आणि UK त जाण्यासाठी नियमांत बदल, पुन्हा नव्या अटी
ओमिक्रॉन व्हेरियंटवर कोविशिल्डचा बूस्टर डोस आहे प्रभावी
कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरियंट आढळून आल्यानंतर हा व्हेरियंट डेल्टापेक्षा अधिक संसर्गजन्य असल्याने लसीच्या बूस्टर डोसची मागणी वाढली आहे. दरम्यान आयसीएमआर मधील (ICMR) शास्त्रज्ञांच्या पथकाला अभ्यासादरम्यान कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीचा बूस्टर डोस ओमिक्रॉनविरुध्द प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. कोविशिल्ड लस ही कोरोनाच्या डेल्टा डेरिव्हेक्टिव्ह निष्प्रभ करण्यास सक्षम असून, यामुळे गंभीर आजार आणि मृत्यू टाळता येतो, असं आयसीएमआरनं म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona spread, Uk corona variant