नवी दिल्ली 21 डिसेंबर : गेल्या दोन वर्षांपासून जगभरात सुरू असलेलं कोरोना महामारीचं (Corona Pandemic) संकट पुन्हा गडद होण्याची शक्यता आहे. सध्या कोरोना व्हायरसच्या 'ओमायक्रॉन' (Omicron) या नवीन व्हेरिएंटची दहशत पसरत आहे. ओमायक्रॉनबाबत जगभरातून भीतीदायक आकडेवारी समोर येऊ लागली आहे. ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये ओमायक्रॉनमुळे दोन मृत्यू झाले आहेत. भारतातही ओमायक्रॉनचा शिरकाव झाला असून आतापर्यंत 170 पेक्षा जास्त नागरिकांना त्याची लागण झाली आहे.
कोरोनाच्या बहुतेक लसी (Covid-19 Vaccine) ओमायक्रॉनविरूद्ध प्रभावी ठरत नसल्याची बाब प्राथमिक संशोधनातून निदर्शनास आल्यानं चिंता वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेतील सुरुवातीच्या आकडेवारीनुसार ओमायक्रॉन व्हेरियंट हा डेल्टा व्हेरिएंटपेक्षा (Delta variant) कमी गंभीर असल्याचं म्हटलं जातं होतं. मात्र, ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासात ही गोष्ट नाकारण्यात आली आहे. याशिवाय ओमायक्रॉन पुरुषांसाठी जास्त घातक असल्याचं निदर्शनास आलं आहे. आज तकनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
कोरोनाच्या Omicron व्हेरियंटसमोर 'या' दोन vaccine वगळता इतर निष्प्रभ : संशोधन
जेव्हा दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरुवातीला ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार झाला होता. तेव्हा रुग्णांची लक्षणं आणि रुग्णालयात भरती होण्याच्या संख्येवरून ओमायक्रॉन जास्त घातक नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. मात्र, या निष्कर्षामध्ये प्रत्यक्ष पुराव्यांचा आधार नव्हता. त्यामुळे लंडनच्या इंपिरियल कॉलेजमधील (Imperial College London) संशोधकांनी पुन्हा अभ्यास केला. त्यांनी ओमायक्रॉनची लागण झालेल्या 11 हजार 329 लोकांचा आणि कोरोनाच्या इतर व्हेरिएंटची लागण झालेल्या दोन लाख लोकांचा अभ्यास केला. या अभ्यासात अनेक धक्कादायक गोष्टी निदर्शनास आल्या आहेत.
रिपोर्टमधील आकडेवारीनुसार, डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनमध्ये री-इंफेक्शन (Reinfection) होण्याचा धोका 5.4 पटीने जास्त आहे. ब्रिटनमध्ये उपलब्ध असलेल्या लसींचे दोन डोस दिल्यानंतर ओमायक्रॉनची लक्षणं असलेल्या रुग्णांवर त्या लशींचा 0 ते 20 टक्के परिणाम झाल्याचं लक्षात आलं आहे. याच रुग्णांना बूस्टर डोस दिल्यावर लशींचा परिणाम 55 ते 80 टक्के दिसला. ओमायक्रॉनमध्ये संसर्गाच्या संरक्षणामध्ये 19 टक्क्यांनी घट झाली आहे.
मोठी बातमी: लस घेतलेल्या 90% भारतीयांना Omicron चा धोका- संशोधन
कोविड-19मधून बरे झालेल्या काही रुग्णांमध्ये काही महिन्यांपर्यंत स्पर्म क्वालिटी (Sperm quality) खराब झाल्याचं, संशोधकांना आढळलं. 35 पुरुषांवर याबाबत संशोधन करण्यात आलं. या पुरुषांच्या स्पर्मला संसर्ग झालेला नव्हता. मात्र, कोरोनातून बरं झाल्यावर एका महिन्यानंतर त्यांच्या स्पर्मची गतिशीलता 60 टक्क्यांनी कमी झाली आणि स्पर्मची संख्या 37 टक्क्यांनी कमी झाली. असं असलं तरी, कोरोनाचा संसर्ग आणि स्पर्मच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणताही संबंध आढळला नाही. हे संशोधन 'फर्टिलिटी अँड स्टेरिलिटी'मध्ये (Fertility and Sterility) प्रकाशित झालं आहे. संशोधकांचं म्हणणं आहे की, कोविड-19 संसर्गानंतर पालक होऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांना याबाबत माहिती दिली गेली पाहिजे.
वरवर ओमायक्रॉन डेल्टापेक्षा कमी घातक दिसत असला तरी त्याचे अंतर्गत परिणाम जास्त आहेत, असं ब्रिटनमधील संशोधकांच्या निदर्शनास आलं आहे. त्यामुळं प्रत्येकानं आपापली काळजी घेणं आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona spread, Corona updates