नवी दिल्ली. 20 डिसेंबर : गेल्या दोन वर्षांपासून जगभरात सुरू असलेलं कोरोना महामारीचं (Corona Pendamic) संकट पुन्हा गडद होण्याची शक्यता आहे. सध्या कोरोना व्हायरसच्या 'ओमिक्रॉन' (Omicron) या नवीन व्हेरियंटची दहशत पसरत आहे. ओमिक्रॉनबाबत जगभरातून भीतीदायक आकडेवारी समोर येऊ लागली आहे. भारतातही ओमिक्रॉनचा शिरकाव झाला असून आतापर्यंत 150 पेक्षा जास्त नागरिकांना त्याची लागण झाली आहे. कोरोनाच्या बहुतेक लसी (Covid-19 Vaccine) ओमिक्रॉनविरूद्ध प्रभावी ठरत नसल्याची बाब प्राथमिक संशोधनातून निदर्शनास आल्यानं चिंता वाढली आहे. मात्र, त्यातही एक सकारात्मक गोष्ट म्हणजे लस घेतलेल्या ओमिक्रॉन रुग्णांची स्थिती जास्त गंभीर होत नाही.
कोरानाची कुठली लस ओमिक्रॉन व्हेरियंटवर किती प्रभावी ठरत आहे, याबाबत सध्या जगभरातील अनेक देशांमध्ये संशोधन सुरू आहे. संशोधनातील सुरुवातीच्या अहवालांनुसार, ज्या लोकांना बूस्टर डोससह (Booster Dose) फायझर (Pfizer) आणि मॉडर्ना (Moderna) लस मिळाली आहे, केवळ असेच लोक ओमिक्रॉनच्या संसर्गापासून वाचत आहेत. अमेरिका वगळता इतर मोजक्याच देशांमध्ये या दोन्ही लसी उपलब्ध आहेत. अॅस्ट्राझेनेका ( AstraZeneca), जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson & Johnson) आणि रशियातील लस देखील ओमिक्रॉनपुढे निष्प्रभ ठरली आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणं कठीण होण्याची शक्यता आहे.
या दोन व्हॅक्सिन ठरत आहेत प्रभावी
न्यूयॉर्क टाइम्समधील वृत्तानुसार, लसींच्या प्रभावासंबधित असलेले आतापर्यंतचे बहुतेक पुरावे हे लॅबमधील प्रयोगांवर आधारित आहेत. या प्रयोगांमध्ये शरीरातील प्रतिकारशक्ती पूर्णपणे कव्हर करता येत नाही. फायझर आणि मॉडर्नाचं व्हॅक्सिन नवीन एमआरएनए (mRNA) तंत्रज्ञानावर आधारित आहे. या दोन्ही व्हॅक्सिननं आतापर्यंत लोकांना कोरोनाच्या प्रत्येक नवीन व्हेरियंटपासून संरक्षण दिलं आहे. अमेरिका आणि युरोपातील काही देशांमध्ये यांचा वापर केला गेला आहे.
काय आहे चीनमधील व्हॅक्सिनची स्थिती?
कोरोनाचा सामना करण्यासाठी चीननं सिनोफार्म (Sinopharm) आणि सिनोव्हॅक (Sinovac) या दोन स्वतंत्र व्हॅक्सिनची निर्मिती केलेली आहे. चीनच्या या दोन्ही व्हॅक्सिन ओमिक्रॉनविरुद्ध प्रभावी ठरलेल्या नाहीत. संपूर्ण जगातील लसीकरणाचा विचार केल्यास अर्ध लसीकरण या दोन व्हॅक्सिनच्या मदतीनं करण्यात आलेलं आहे. यामध्ये चीन आणि मेक्सिको, ब्राझीलसारख्या कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांचा समावेश आहे.
Alert! सामान्य वाटणारी समस्याच ओमिक्रॉनचं लक्षण; संशोधनात समोर आली धक्कादायक बाब
काय आहे अॅस्ट्राझेनेकाची स्थिती ?
ब्रिटनमधील प्राथमिक अभ्यासात असं दिसून आलं आहे की, ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका (Oxford-AstraZeneca) व्हॅक्सिन घेऊन सहा महिने उलटल्यानंतर ओमिक्रॉन संसर्गापासून संरक्षण मिळत नाही. भारतात लस घेतलेल्या 90 टक्के नागरिकांना कोविशिल्ड (Covishield) या ब्रँडच्या नावाखाली ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाचं देण्यात आली आहे. आफ्रिकेतही याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला आहे. डब्ल्यूएचओनं (WHO) जागतिक कोविड लसीकरणासाठी राबवलेल्या 'कोव्हॅक्स' (COVAX) या उपक्रमाअंतर्गत 44 देशांना या व्हॅक्सिनचे 67 दशलक्ष डोस वितरित केले गेले आहेत.
काय आहे रशियन व्हॅक्सिनची स्थिती?
रशियामध्ये कोरोनासाठी 'स्पुटनिक' (Sputnik) या व्हॅक्सिनची निर्मिती करण्यात आली आहे. आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेत (Latin America) देशांमध्ये ही व्हॅक्सिन वापरली जात आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार रशियाची ही व्हॅक्सिन ओमिक्रॉनपासून संरक्षण देत नाही. जॉन्सन अँड जॉन्सन व्हॅक्सिनच्या बाबतीतही हीच स्थिती आहे.
नाका-तोंडातून कोरोना करतो शरीरात प्रवेश; आयुष मंत्रालयाने सांगितले हे 5 उपाय
ओमिक्रॉन व्हेरियंट विरुद्ध बहुतेक व्हॅक्सिन निष्प्रभ ठरत असल्यानं संशोधकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. कारण, यामुळं संपूर्ण लसीकरण कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मात्र, लसीकरण झालेल्या रुग्णांवर ओमिक्रॉन जास्त घातक ठरत नाही. त्यामुळं नागरिकांनी एकदम घाबरून जाऊ नये, असं आवाहनदेखील संशोधकांनी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.