मुंबई 21 जून: कोरोना विषाणूच्या (Corona) दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातलेलं असताना स्वाइन फ्लू (Swine Flu) अर्थात एन्फ्लुएंझा H1N1 हा विषाणूही डोकं वर काढू पाहतो आहे. स्वाइन फ्लू आणि कोविड-19 (Covid19) या दोन्ही आजारांची लक्षणं बऱ्यापैकी सारखीच असल्याने रुग्ण कोविड-19च्या उपचारांना दाद देत नसला, तर H1N1च्या शक्यतेचा विचार करावा, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
मुंबईतले संसर्गजन्य रोग या विषयातले तज्ज्ञ डॉ. वसंत नागवेकर (Dr Vasant Nagavekar) यांनी नुकतंच सर्दी, ताप आणि डोकेदुखीच्या दोन रुग्णांवर उपचार केले. त्यापैकी तिशीतला एक रुग्ण नुकताच कोविड-19मधून बरा झाला होता. 90 दिवसांत पुन्हा कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता फारच दुर्मिळ असल्याने डॉक्टरांनी त्याला H1N1 अर्थात स्वाइन फ्लूची टेस्ट करायला सांगितलं. त्या डॉक्टरांचा अंदाज बरोबर आला. रुग्णाला स्वाइन फ्लूची लागण झाली असल्याचं रिपोर्टवरून स्पष्ट झालं. टाइम्स ऑफ इंडियाने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
डॉ. नागवेकर यांना स्वाइन फ्लूचे दोन, तर H3N2 या एन्फ्लुएंझा ए प्रकारच्या उपप्रकाराची लागण झालेला एक रुग्ण आढळला. 'या सगळ्याचा अर्थ एकच आहे, की कोरोनाव्यतिरिक्त अन्य विषाणूंचा फैलावही होतो आहे. त्यामुळे पेशंट कोविडच्या उपचारांना दाद देत नसेल, तर बाकीच्या विषाणूंच्या संसर्गाची शक्यता गृहीत धरायला हवी,' असं मत डॉ. नागवेकर यांनी व्यक्त केलं.
भीषण अपघात: ट्रकच्या धडकेत कंटेनर एक्स्प्रेस वेवर आडवा
मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अधिकाऱ्यानेही H1N1च्या दोन रुग्णांची महापालिकेकडे नोंद झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. काही वर्षांपूर्वी मुंबईत H1N1च्या रुग्णांची मोठ्या प्रमाणावर नोंद झाली होती. गेल्या वर्षी 44, तर 2019मध्ये 451 रुग्णांची नोंद झाली होती. 2019मध्ये यामुळे पाच मृत्यूही झाले होते.
संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव (Dr Om Srivastava) यांनी सांगितलं, 'कोविड-19 आणि स्वाइन फ्लू हे दोन्ही श्वसनसंस्थेशी निगडित आजार आहेत. त्यामुळे निदान योग्य होणं गरजेचं आहे. लक्षणांमध्ये साधर्म्य असलं, तरी हे विषाणू किती दिवस सुप्तावस्थेत राहतात आणि त्यांचा संसर्ग कसा पसरतो, यात फरक आहे.'
भारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार
'अशाही काही केसेस आहेत, की ज्यात पेशंटच्या H1N1 आणि कोविड-19 अशा दोन्हींच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. त्यात अनेक केसेसमध्ये H1N1चा रिपोर्ट फॉल्स पॉझिटिव्ह (False Positive) असल्याचं स्पष्ट झालं; पण H1N1चा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण त्यामुळेही गंभीर आजार होऊन मनुष्य मरू शकतो,' असंही डॉ. श्रीवास्तव यांनी सांगितलं.
H1N1 विषाणू संसर्गात एक आड एक वर्षाने वाढ होत असल्याचं ट्रेंडवरून दिसून येतं. 2019मध्ये महाराष्ट्रात H1N1चे 2287 रुग्ण आढळले होते आणि त्यापैकी 246 जणांचा मृत्यू झाला होता. 2020मध्ये 121 रुग्ण आढळले होते आणि तीन जणांचा मृत्यू झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona spread, Swine flu in india