नवी दिल्ली 28 मे : कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण (Vaccination) हाच एकमेव प्रभावी मार्ग असल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपासूनच वेगवेगळ्या प्रकारच्या लशी विकसित करण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. त्यातल्या काही लशींना मंजुरी मिळून त्यांचा वापर करून लसीकरण सुरूही झालं आहे. नाकातून देता येणाऱ्या लशींबद्दलही वेगवेगळ्या ठिकाणी संशोधन सुरू आहे. कॅनडाच्या सॅनोटाइझ (Sanotize) या कंपनीने अशी नाकातून देता येण्याजोगी लस विकसित केली असून ही लस शरीरातल्या 99.99 टक्के कोरोना विषाणूंना मारून टाकण्याएवढी प्रभावी आहे, असा दावा कंपनीने केला आहे. 'आज तक'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
नेझल स्प्रे (Nasal Spray) स्वरूपातल्या या लशीच्या क्लिनिकल ट्रायल्स (Clinical Trials) अमेरिका, कॅनडा, इस्रायल आणि न्यूझीलंडमध्ये यशस्वी झाल्याचं 'सॅनोटाइझ'च्या संस्थापक गिली गेलवे यांनी सांगितलं. लवकरच ही लस भारतात दाखल करण्यासाठीची प्रक्रिया सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.
गिली गेलवे यांनी एका माध्यमाला दिलेल्या माहितीनुसार, हा नेझल स्प्रे नायट्रिक ऑक्साइडपासून (Nitric Oxide) बनवण्यात आलेला आहे. हे रासायनिक द्रव्य मानवी शरीरात आधीपासूनच अस्तित्वात असतं. त्यामुळे या स्प्रेचे साइड इफेक्ट्स होत नाहीत, असा दावा त्यांनी केला. शरीरात कोणत्याही प्रकारचे विषाणू (Virus) किंवा जिवाणू (Bacteria) तयार होणं, त्यांची वाढ होणं याला नायट्रिक ऑक्साइड प्रतिबंध करतं. शरीरात या रसायनाचं अस्तित्व असल्यामुळे शरीराची प्रतिकार यंत्रणा त्याला प्रतिकार न करता स्वीकार करते. विषाणू मुख्यतः नाकातूनच शरीरात प्रवेश करत असल्यामुळे हा नेझल स्प्रे या विषाणूंचा मार्गच रोखण्याचं काम करतो. हा अडथळा ओलांडून पलीकडे जाणं कोरोना विषाणूला कठीण होऊन बसतं. हा स्प्रे नाकापासून फुप्फुसांपर्यंतची श्वासनलिका विषाणूमुक्त करण्याचं काम करतो.
या नेझल स्प्रेच्या चाचण्यांमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींच्या शरीरातलं कोरोना विषाणूंचं प्रमाण 24 तासांत 95 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचं आढळलं. तसंच, त्यापुढच्या 72 तासांत ते 99 टक्क्यांपर्यंत कमी झालं. त्यामुळे हे औषध क्रांतिकारी ठरेल, असं मत ब्रिटनमध्ये झालेल्या चाचण्यांवर संशोधन करणारे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. स्टीफन विन्चेस्टर यांनी सांगितलं. सॅनोटाइझच्या चाचण्यांचे निष्कर्ष 'जर्नल ऑफ इन्फेक्शन'मध्ये प्रसिद्ध झाले आहेत.
या नेझल स्प्रेमधल्या नायट्रिक ऑक्साइडमुळे नाकातून होणारा विषाणूंचा प्रवेश तर रोखला जातोच; पण जे विषाणू शरीरात आधीच गेले आहेत, त्यांना पेशीमध्ये प्रवेश करणंही नायट्रिक ऑक्साइडमुळे शक्य होत नाही. दोन्ही बाजूंनी विषाणूचा मार्ग रोखला गेल्यामुळे या स्प्रेमुळे 72 तासांमध्ये 99.99 टक्के विषाणू नष्ट होतात, असं कंपनीकडून सांगण्यात आलं.
गिली गेलवे यांनी सांगितलं, की हा स्प्रे भारतात (India) सादर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी चांगली पार्टनर कंपनी शोधली जात असून, अनेक कंपन्यांनी यात रस दाखवला आहे. भागीदारी निश्चित झाली, की भारत सरकारकडून औषधाच्या सादरीकरणासाठी परवानगी मागितली जाणार आहे. उत्पादन आणि पुरवठ्याची जबाबदारी भारतातल्या कंपनीचीच असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रातील या जिल्ह्यातून दिलासादायक बातमी, कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट
हा स्प्रे डॉक्टर्सच्या प्रिस्क्रिप्शनवर घेणं गरजेचं आहे, की सरकार थेट त्याचं वाटप करू शकतं, हे क्लिनिकल ट्रायल्सचे रिपोर्ट पाहून, तपासणी करून भारताची औषध नियामक यंत्रणा ठरवेल. ज्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहेत, त्या व्यक्ती दिवसात चार-पाच वेळा हा स्प्रे वापरू शकतात. गंभीररित्या आजारी असलेल्या व्यक्तींमध्ये याचा वापर कसा करायला हवा, याबद्दलचा निर्णय डॉक्टरच घेतील. कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून जे लोक याचा वापर करत असतील, त्यांनी तो दिवसातून एक-दोनदा वापरला तरी चालेल. हा स्प्रे संसर्ग होण्याच्या आधी, संसर्ग झाल्यावर आणि त्यातून बरं झाल्यानंतरही वापरणं शक्य आहे, असं गेलवे यांनी स्पष्ट केलं.
या स्प्रेची किंमत अद्याप ठरवलेली नसली, तरी प्रत्येक नागरिकाला सहज खरेदी करणं शक्य होईल, एवढीच त्याची किंमत ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असंही गिली गेलवे यांनी सांगितलं. 'अन्य लशींच्या तुलनेत नाकाद्वारे दिली जाणारी लस अधिक प्रभावी असते. कारण विषाणू जिथून प्रवेश करतो, तिथूनच ही लस त्यावर हल्ला करणं सुरू करते,' असं वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीनमध्ये रेडिएशन ऑन्कोलॉजी विषयाचे प्राध्यापक आणि बायोलॉजिक थेराप्यूटिक्स सेंटरचे संचालक डॉ. डेव्हिड क्युरियल यांनी सांगितलं.
PM इव्हेंट मॅनेजर, त्यांची नौटंकीच दुसऱ्या लाटेस कारणीभूत, राहुल गांधींची टीका
नेझल स्प्रे तत्त्वावरच्या अनेक लशींवर जगभरात संशोधन सुरू आहे. भारतातही हैदराबादमधली भारत बायोटेक कंपनी कोरोफ्लू नावाचा नेझल ड्रॉप विकसित करत आहे. कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या नाकात याचा एक थेंब घातला जाणार असून, हा ड्रॉप पूर्णतः सुरक्षित असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona patient, Corona spread, Coronavirus