Home /News /coronavirus-latest-news /

भारतात कोरोना काळात Dolo ची भरमसाठ विक्री; खपलेल्या गोळ्या एकत्र केल्यास बनेल बुर्ज खलिफापेक्षाही उंच इमारत

भारतात कोरोना काळात Dolo ची भरमसाठ विक्री; खपलेल्या गोळ्या एकत्र केल्यास बनेल बुर्ज खलिफापेक्षाही उंच इमारत

सध्या डोलो (Dolo) ही भारतात विकली जाणारी दुसऱ्या क्रमांकाची तापावरची आणि वेदनाशामक गोळी आहे. त्यांची 2021 मध्ये एकूण उलाढाल 307 कोटी रुपयांची होती.

नवी दिल्ली 17 जानेवारी : तुम्हाला कोविड-19 संसर्ग झाला असताना तुम्ही Dolo 650 घेतली होती का? अनेकांनी कोविड काळात डोलो गोळी घेतली आहे. भारतात 2020 मध्ये कोविडची लाट सुरू झाल्यापासून तब्बल 350 कोटी या अँटी फीव्हर म्हणजेच तापावर उपचार करणाऱ्या गोळ्या विकल्या गेल्या आहेत अशी माहिती समोर आली आहे. ताप येणं हे कोविड-19चं एक सर्वसामान्य लक्षण आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत डोलो गोळ्यांची विक्री जवळपास दुपटीने वाढली आहे (Dolo Tablets Sold in India During Corona Pandemic). सर्दी आणि तापासाठी पॅरासिटामोल्स जास्त घेतल्या गेल्या अशी माहिती आहे. विकल्या गेलेल्या या सगळ्या गोळ्या एकावर एक ठेवल्या, तर त्यांची उंची माउंट एव्हरेस्टच्या 6000 हजार पट किंवा जगातली सगळ्यात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफाच्या 63,000 पट होईल. विश्वास बसणार नाही, पण हे अगदी खरं आहे. गेल्या दोन वर्षांत डोलो ही गोळी क्रोसिन या भारतातल्या सगळ्यात लोकप्रिय पॅरासिटामोलपेक्षा जास्त विकली गेली आहे. IQVIA या संशोधन संस्थेच्या माहितीनुसार कोविडची साथ सुरू होण्याआधी म्हणजे 2019 मध्ये भारतात डोलोच्या 7.5 कोटी स्ट्रिप्स विकल्या गेल्या होत्या. त्यानंतर डोलोच्या वर्षभरात 9.4 स्ट्रिप्स विकल्या गेल्या. प्रत्येक स्ट्रिपमध्ये 15 गोळ्या असतात. म्हणजे एकूण 141 कोटी गोळ्या विकल्या गेल्या. नोव्हेंबर 2021पर्यंत या गोळ्यांची विक्री दुप्पट झाली. जवळपास 14.5 कोटी स्ट्रिप्स म्हणजेच 217 कोटी गोळ्या नोव्हेंबर 2021 पर्यंत विकल्या गेल्या होत्या. Omicron कोरोनाचा व्हेरिएंट नसून वेगळी महामारी? शास्त्रज्ञाचा मोठा दावा सप्टेंबर 2020 मध्ये भारतात कोरोनाची पहिली लाट यायला सुरुवात झाली होती, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. 2021च्या मे महिन्यात दुसरी लाट आली. कोरोनाच्या या लाटेत सर्वांत जास्त मृत्यू झाले. भारतात या काळात जवळपास साडेतीन कोटी रुग्णसंख्या नोंदवण्यात आली होती. त्यामुळे महामारीच्या या दोन्ही वर्षांत मिळून डोलोच्या जवळपास 350 कोटी गोळ्यांची विक्री झाली. सध्या डोलो (Dolo) ही भारतात विकली जाणारी दुसऱ्या क्रमांकाची तापावरची आणि वेदनाशामक गोळी आहे. त्यांची 2021 मध्ये एकूण उलाढाल 307 कोटी रुपयांची होती. GSK च्या Calpol ची विक्री डोलोपेक्षा थोडीशीच जास्त आहे. त्यांची एकूण उलाढाल 310 कोटींची होती. क्रोसिन ही तशी लोकप्रिय गोळी सहाव्या क्रमांकावर आहे. त्यांची उलाढाल आहे 23.6 कोटींची. कोविड नसताना म्हणजे 2019 या वर्षी पॅरासिटामोल या अंतर्गत येणाऱ्या सर्व ब्रँड्सच्या गोळ्यांची एकूण विक्री जवळपास 530 कोटी होती. ही विक्री 2021 मध्ये 70 टक्क्यांनी वाढली आणि ती जवळपास 924 कोटींपर्यंत पोहोचली. विशेष म्हणजे नागरिक Dolo फक्त विकत घेत नाहीत, तर त्याबद्दलची माहिती मिळवण्यासाठी गुगलवर सर्चही करत असल्याचं लक्षात आलं आहे. जानेवारी 2020 म्हणजे कोविडची साथ सुरू झाली तेव्हापासून ‘Dolo 650’ या की वर्डने गुगलवर जवळपास दोन लाख सर्चेस नोंदवण्यात आले आहेत. ‘Calpol 650’ याची माहिती 40,000 वेळा शोधण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान हे सर्चिंग दुपटीनं वाढलं होतं.

लाट ओसरतेय, R-Value घसरतेय; येतेय Good News

खरं तर 1960 पासून Paracetamol हे सर्वसामान्य औषध बाजारात उपलब्ध आहे. ताप कमी करण्यात आणि वेदनाशामक म्हणून ही गोळी साधारणपणे सगळीकडे वापरली जाते. Crocin किंवा Dolo किंवा Calpol या सगळ्या गोळ्यांमध्ये सारखंच सोडियम क्लोराइड (Salt) आहे; पण त्या गोळ्या विविध ब्रँड्सच्या नावाने त्यांच्या कंपनीच्या कॉपीराइट ब्रँड अंतर्गत विकल्या जातात. Dolo च्या यशामागचं कारण काय, असा प्रश्न पडणं साहजिक आहे. या गोळ्या इतक्या वापरल्या गेल्या होत्या की सोशल मीडियावर त्याबद्दलची भरपूर मीम्स शेअर झाले होते. जवळपास प्रत्येक भारतीयाने ही गोळी घेतल्याचे मीम्सही प्रसिद्ध झाले होते. अगदी ताप असो, अंगदुखी, कोविड-19, डोकेदुखी किंवा दातदुखी, प्रत्येकावर फक्त Dolo हे एकमेव औषध असल्याचा दावाही या मीम्समधून करण्यात आला होता. हे मीम्सही खूप व्हायरल झाले होते. Dolo ला मिळालेली प्रसिद्धी नवीन नाही. “खरं तर 2010 मध्ये, Dolo ला त्या वर्षीचं सर्वोत्तम व्यवस्थापन असलेला ब्रँड म्हणून गौरवण्यात आलं होतं. त्याला इतर प्रशस्तिपत्रकं तर मिळालीच; पण भारतात सर्वांत जास्त स्तुती करण्यात आलेला ब्रँड म्हणूनही त्याला नावजण्यात आलं होतं,” असं भारतातल्या फार्मा कंपन्यांच्या लॉबीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एका अनुभवी तज्ज्ञानं सांगितलं. Dolo मिळालेल्या प्रसिद्धीमागे अन्य गोष्टींबरोबरच चांगल्या नशिबाचाही भाग असल्याचं महाराष्ट्रातल्या महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमधले वैद्यकीय विभागाचे प्रोफेसर डॉ. एस. पी. कलंत्री यांचं म्हणणं आहे. रुग्णाची त्रासाची पातळी जास्त असताना हे ‘वर्कहॉर्स पेनकिलर’ रुग्णांना आराम देतात, असंही त्यांनी सांगितलं. सर्वसामान्य जनता आणि डॉक्टर्स यांचं लक्ष या गोळीनं इतकं का वेधून घेतलं? “हा निव्वळ नशिबाचा भाग, योगायोग, अत्यंत हुशारीनं केलेलं मार्केटिंग, सोशल मीडिया किंवा कोविड काळात रुग्णांची वाढलेली गरज यापैकी नेमकं काय कारण असावं? ” अचानक या गोळीला इतकी लोकप्रियता का मिळाली हे गृहीतकांवरून स्पष्ट करणं अवघड आहे. सर्व पॅरासिटॅमॉल्स सारख्याच असतात. ताप कमी करणं आणि वेदना कमी करणं हेच त्यांचं काम असतं, असं त्यांचं म्हणणं आहे. डॉक्टर, ब्रँड तज्ज्ञ आणि या क्षेत्रातले तज्ज्ञ यांच्या मते या गोळीचं छोटं नाव हे Dolo लोकप्रिय होण्यामागचं पहिलं कारण आहे. Pyrigesic, Pacimol, Fepanil आणि Paracip या नावांपेक्षा Dolo हे नाव उच्चारायला सोपं आहे. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे कंपनीनं 650 milligram (MG) विभागात केलेला प्रवेश आणि एखाद्या माहिती नसलेल्या आजारात येणाऱ्या तापावर हे अत्यंत प्रभावी औषध असल्याचा समज. अन्य गोळ्या 500 मिलिग्रॅमच्या असताना Dolo मात्र 650 मिलिग्रॅममध्ये काढण्याची गरज आणि संधी 1973 मध्ये बेंगळुरूमधल्या Dolo च्या निर्मात्या MICRO Labs च्या लक्षात आली. त्यानंतर ही गोळी Dolo 650 या नावानेच लोकप्रिय झाली. 500 मिलिग्रॅमच्या गोळीपेक्षा 650 मिलिग्रॅमची गोळी जास्त लवकर त्रास कमी करते हा वैद्यकीय पुरावा कंपनीच्या वतीने योग्य पद्धतीने वापरण्यात आला. Micro Labs च्या वतीने डॉक्टरांसाठी मायक्रो नॉलेज अकॅडमी अंतर्गत ‘Pyrexia of unknown origin’ यावर Continuing Medical Education (CME) ची मालिका सुरू करण्यात आली होती, अशी आठवण फार्मा ब्रँडमधले तज्ज्ञ विवेक हट्टंगडी यांनी सांगितली. “तापासाठी Pyrexia हा शब्द वैद्यकशास्त्रात वापरला जातो. डॉक्टर त्याला ‘FUO’ or ‘Fever of Unknown Origin’ अशी संकल्पना डॉक्टर वापरतात,” त्यांनी फार्मा ब्रँड व्यवस्थापनातले गुरू छित्ता मित्रा यांचाही उल्लेख केला.

सक्तीच्या लसीकरणाचा निषेध असो! 'या' देशातील जनता उतरलीय रस्त्यावर; वाचा सविस्तर

मायक्रो लॅब्सची “FUO” ही संकल्पना त्यांच्या ब्रँड प्रमोशनसाठी वापरण्याच्या कल्पनेमुळे त्याची लोकप्रियता वाढली. “कोणत्या तरी अज्ञात कारणामुळे येणाऱ्या तापावरचा उपाय म्हणून हा ब्रँड लोकप्रिय झाला. कोणताही ताप असू दे, डॉक्टर Dolo 650 लिहून देऊ लागले,” असं हट्टंगडी यांनी म्हटलं आहे. साधा ताप आणि जास्त ताप म्हणजेच हाय फीव्हर यातली गॅप कंपनीने ओळखून ती ठळकपणे मांडली, असं मायक्रो लॅब्सचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप सुराणा यांनी The CEO Magazine ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. “अनेकदा अज्ञात कारणांमुळे येणारा ताप हा जास्त असल्याचं लक्षात आलं आहे. त्याच वेळेस आम्ही डॉक्टरांकडे Dolo 650 ची प्रसिद्धी करायला सुरुवात केली. डॉक्टरांकडूनही त्याला चांगला प्रतितसाद मिळाला,” असं त्यांनी त्यांनी 2021च्या जानेवारीमधल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे. Dolo च्या उत्पादनाचा बॅच साइज (म्हणजेच एका वेळेस किती गोळ्या उत्पादन करायच्या) 25 टक्क्यांनी वाढल्याचंही त्यांनी सांगितलं. पॅरासिटामोलअंतर्गत येणारा Crocin हा पहिला ब्रँड होता, असं हट्टंगडी यांचं म्हणणं आहे. दिवंगत जी. एम. मसुरकर यांचं क्रोसिन लोकप्रिय करण्यात मोठं योगदान होतं. ते Crookes Interfran या औषध निर्मिती कंपनीच्या विक्री आणि प्रसिद्धी विभागाचे प्रमुख होते. तीच कंपनी नंतर Duphar Interfran आणि त्यानंतर Solvay म्हणून ओळखली जाऊ लागली. 1990 मध्ये क्रोसिन Smithkline Beecham Pharmaceuticals विकण्यात आली. याचंच नंतर ग्लॅक्सो कंपनीत विलीनीकरण झालं, असं हट्टंगडी यांनी सांगितलं. यामुळे क्रोसिनकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असंही म्हटलं जातं. एखादं औषध OTC झाल्यानंतर डॉक्टर ते कमी वेळा लिहून देतात. हे औषध घेण्यासाठी मग तुम्हाला दरवेळेस डॉक्टरच्या सल्ल्याची गरज पडत नाही. क्रोसिनबाबत असंच झालं. त्यामुळे डॉक्टरांनी ते लिहून देणं कमी केलं. डॉक्टरांनी एखाद्या वेळेस एखाद्या विशिष्ट ब्रँडचं औषध लिहून दिलं की त्याबद्दल रुग्ण आणि त्याच्या कुटुंबामध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. त्यानंतर पुढच्या वेळेपासून ते स्वत:हून तेच औषध घ्यायला सुरुवात करतात. Dolo बाबतही असंच घडलं असावं.
First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus

पुढील बातम्या